राज्यात कोरोनामुळे 195 मुलांवरील मायेचं छत्र हरवलं; मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र निर्णय घेणार का?
या 195 पैकी 42 जणांची जबाबदारी राज्य सरकारने आधीच घेतली आहे. कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांचा प्रश्न गंभीर झाल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे.
मुंबई : राज्यात कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबं उध्वस्त झाली. अनेक मुलं डोक्यावरील मायेचं छत्र हरवल्याने अनाथ झालीत. सध्या या मुलांचं भविष्य अंधारात आहे. याचं पुढे कसं होणार? असा प्रश्न आता समाजमनातून उपस्थित होत आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं हे पाहणे महत्वाचे आहे.
राज्यात कोरोनामुळे आपले पालक गमावलेल्या मुलांची एकूण संख्या 195 आहे. त्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या 108 आहे. तर एकच पालक गमावलेली मुलं 87 आहे. सगळ्यात जास्त अनाथ झालेल्या मुलांची संख्या नंदुरबार इथे आहे. नंदुरबार इथे 93 मुलं अनाथ झाली आहेत. त्यातील 66 मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले तर 27 मुलांनी एकच पालक गमावले आहे.
त्या खालोखाल
- हिंगोली 18
- जालना 16
- गोंदिया 12
- ठाणे 11
- अहमदनगर 8
- नागपूर 7
- परभणी 4
- पुणे 4
- धुळे 3
- बुलढाणा 3
- पालघर 2
- रत्नागिरी 2
- सिंधुदुईग 2
- वाशीम 2
अश्या मुलांनी आपल्या पालकांना गमावलं आहे. या 195 पैकी 42 जणांची जबाबदारी राज्य सरकारने आधीच घेतली आहे. कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांचा प्रश्न गंभीर झाल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे. हा टास्क फोर्स त्या त्या जिल्ह्यातील मुलांची जबाबदारी पाहणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणार आहे. सोबतचं प्रतिमहिना पाच हजार रुपयेही देणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या मुलांसताही काय करणार हा प्रश्न आहे.