Salman Khan on Lawrence Bishnoi: नियतीने माझ्या नशिबात जितकं आयुष्य लिहलंय... लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल विचारताच सलमान खानचं उत्तर
Salman Khan & Lawrence Bishnoi gang: लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानच्या जीवाला धोका असल्यामुळे भाईजानच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. तरीही भीतीचे सावट कायम

मुंबई: अभिनेता सलमान खान याचा 'सिकंदर' हा चित्रपट पुढील आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत सलमान खान (Salman Khan) याने बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्री आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी त्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून (Lawrence Bishnoi Gang) देण्यात येणाऱ्या धमक्यांविषयी विचारण्यात आले. सलमान खान याने या प्रश्नावर फार बोलणे टाळले. त्याने वर आकाशाकडे हात करत, 'अल्लाह है, भगवान है, सब उन पर हैं... नियतीने माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहलं आहे, तेवढं आहे. बस इतकचं. कधी कधी इतक्या साऱ्या लोकांना सोबत घेऊन चालताना अडचणी निर्माण होतात, असे सलमान खान याने म्हटले.
सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीत 1998 साली काळवीटाच्या हत्येवरुन वाद निर्माण झाला होता. लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यंतरी सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबारही करण्यात आला होता. त्यानंतर सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानाबाहेरच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली होती. यानंतरच्या काळात वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात सलमान खानसोबत कौटुंबिक संबंध असणारे राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्येही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात होता. तेव्हापासून सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली होती. सलमान खानच्या सुरक्षेच्या कारणामुळे सिकंदर चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लाँच सोहळाही रद्द करण्यात आला होता.
गेल्या काही काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँग गेल्या वर्षीपासून सलमान खानच्या मागे हात धुवून लागल्याचं पाहायला मिळालं. धमकीचे मेसेज, धमकीचे ई-मेल, पत्र आणि गोळीबार अशा अनेक घटना घडल्या. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर अनेक गोष्टी आढळल्या. आरोपींनी सलमान खानला मारण्याचा कट रचला होता. त्यांनी सलमानचं घर आणि पनवेलच्या फार्महाऊसची रेकीही केली होती. याशिवाय, सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा कट होता, असेही आरोपींनी कबूल केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात, सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याबद्दल लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी वाचा





















