एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नामकरण ते दिशा सालियन प्रकरण यांसह विविध मुद्द्यावर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मुंबई : राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आता या अधिवेशनातून सर्वसामान्य जनतेला काय मिळालं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विरोधकांनी सरकारच्या अधिवेशनातील कामकाजावर टीका केली असून या अधिवेशनातून जनतेला काहीच मिळालं नाही. औरंगजेबाच्या कबरीपासून ते कुणाल कामरापर्यंत सगळे निरर्थक विषय सभागृहात घेतल्याची टाकाही होत आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केलीय. अस्वस्थ सरकाराने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्पीय अधिवेशन हे होतं, अपयश लपवणार हे अधिवेशन होतं. 100 दिवसात हे सरकार काय करणार असा संकल्प त्यांनी दिला होता, त्यातले किती संकल्प पूर्ण केले? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नामकरण ते दिशा सालियन प्रकरण यांसह विविध मुद्द्यावर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
महायुती सरकारकडून एकही संकल्प पूर्ण करण्यात आला नाही, हा संकल्प कुठेही दिसला नाही. हे सरकार सत्तेत आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हत्या, संतोष देशमुख हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण, रस्ते घोटाळ्यासह अनेक भ्रष्टाचारचे प्रकरण समोर आली आहेत. शेतकरी कर्जमाफीबद्दल वाच्यता नाही, लाडक्या बहिणीला 2100 रुपये नाही, याउलट आता त्यात वर्गवारी सुद्धा बहिणींची करण्यात आली आहे. नको ती योजना, अशी वेळ त्या बहिणीवर येते कीं काय? असं त्यांना वाटतं असेल असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरूनही उद्धव ठाकरेंनी सरकावर निशाणा साधला. कबरीपासून कामरापर्यतचे हे अधिवेशन होते, असेच उद्धव ठाकरेंनी म्हटले.
1. नागपूर दंगलीची सारवासरव मुख्यमंत्री करत आहेत, आज ज्याला मुख्यमंत्रीपदाचे कोंब फुटले होते ते कोंब काही गेले नाही. आता मुख्यमंत्री यांना असं वाटतं असेल की याला एवढ देऊनही असं सुरु आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
2. उद्धव ठाकरेंनी 3 अक्षरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं नामकरण केलं आहे. एकनात संभाजी शिंदे या नावाचा शॉर्ट फॉर्म करत 'एसंशी' ही शिवसेना नाही तो एक गट आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
3. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी या सरकाराची गत झाली आहे, वाटेल त्या घोषणा करायच्या पण सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पीय बजेटमधून काहीच मिळालं नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
4. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं बोंबलणारे टोपी घालून सौगात ए-मोदी वाटायला जात आहेत. आता हे सौगात ए मोदी यांनी सुरू केलं आहे. 32 हजार कार्यकर्ते हे वाटप करणार आहेत, पण हे सौगात ए सत्ता आहे. बटेगे तो कटेंगे म्हणणारे आता त्यांना वाटणार आहे, आता हे टोपी घालून सौगात कशी वाटायला जातात हे बघायचं आहे. होळीला मुस्लिमांबद्दल बोंब मारणारे आता निवडणुकीवेळी पुरणपोळी देत आहेत. सौगात हे सत्ता फक्त बिहार निवडणुकीच्यापूर्ती आहे की पुढे सुद्धा सुरु राहणार आहे. आता, भाजपने हिंदुत्व सोडल हे त्यांनी सांगावं. आम्ही भाजपला म्हणालो होतो भाजपाने झेंड्यातून हिरवा रंग काढावा, त्यांनी तो रंग काढला नाही, असे म्हणत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.
5. दिशा सालियन प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. जे प्रकरण मला माहित नाही, त्याबद्दल मी काय बोलू? असे म्हणत दोन वाक्यात विषय संपवला.
6. मनसेकडूनही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला जात असल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. कारण, त्यांना कळते की या शिवाय पर्याय नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
7. विधिमंडळाचं अभिवेशन संपलं पण अद्यापही विरोधी पक्षनेता नेमण्यात आला नाही. सत्तेचा माज यालाच म्हणतात, तुमचं सरकार जनतेचा आवाज कसा दाबताय हे आम्ही राज्यपाल महोदयांना सांगितलं आहे. विरोधी पक्षनेते पद संवैधानिक पद आहे, तरीसुद्धा दिले जात नाही, अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.
8. प्रशांत कोरकटकरकडून हे सर्वजण निबंध लिहून घेतील आणि त्याला सोडून देतील. तुम्ही सोलापूरकरला साधा समन्स देखील पाठवला नाही. कोरटकरला हे सोडून देतील, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्या शाळेमध्ये बलात्कार झाला होता बदलापूरची शाळा तो संस्थाचालक आपटे कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
9. संभाजी भिंडे यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात केलेल्या टीपण्णीवरुन उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी कोणत्या झाडाचा आंबा खाल्ला आहे मला अजून कळालं नाही, असा मिश्कील टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
10. वाघ्या कुत्र्याबद्दल सगळ्या इतिहासकारांचा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच काय तो निर्णय घेतला पाहिजे. पण त्याचं काय करायचं ते करा पण त्याआधी अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं, ज्याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं? याची आठवणही ठाकरेंनी करुन दिली. याचच स्मरण करावं लागतंय हे दुर्दैवी आहे, मी त्यांना स्मरणपत्र देणारा कोण मोठा लागून गेलो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
























