एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : उद्धव ठाकरे...काल, आज आणि उद्या
संघटनात्मक बांधणी, नियोजन यासाठी ओळखले जाणारे उद्धव ठाकरे शिवसेनेला अधिक गतीने पुढे घेऊन जाताना दिसतायत.
मुंबई : ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो , भगिनींनो आणि मातांनो...’ शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीला असणारे शब्द...नेमके तेच...ज्यांची लाखो शिवसैनिकच नाही तर त्यांच्यावर प्रेम कऱणारे, द्वेष करणारे असे सर्वच आतुरतेने वाट पाहत असत. तेच शब्द आता उद्धव ठाकरे यांच्या तोंडून...शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिन मेळाव्यात कानी पडले...शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला...बाळासाहेबांच्या भाषणाच्या सुरुवातीला होणाऱ्या कडकडाटाची आठवण करुन देणारा...शिवसैनिकांना आपला नेता भावला असल्याचे दाखवून देणारे...मात्र, समोर बसलेल्या शिवसैनिकांकडे पाहताना उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांसमोरून राजकारणातील त्यांचा प्रवास तरळला असेल.
‘चांगले फोटोग्राफर आहेत ते...त्यातही वन्यजीवांची छायाचित्रं खूप चांगली टिपतात...राजकारणाची तेवढी समज वाटत नाही...’ उद्धव ठाकरेंबद्दल एक नाही असे अनेक समज होते...तो काळच होता तसा.
आणीबाणीनंतर संथावलेली शिवसेना 1985 नंतर पुन्हा झेपावत पुढे निघाली होती. 1989 च्या दरम्यान विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरेही राजकारणात सक्रीय झाले. मात्र उद्धव ठाकरे 1995 ला सत्ता मिळाली तरी तसे लोकांसमोर नव्हते. ते सक्रीय होते. मात्र पडद्यामागून. शिवसेनेची प्रचार रणनीती ठरवण्यात ते होते. शिवसेनेच्या प्रचार आणि प्रसारात मुख्य भूमिका निभावणाऱ्या दैनिक सामनाच्या प्रकाशनापासून प्रत्येक घडामोडीत उद्धव ठाकरे सहभागी होते. तरीही त्यांची लोकांच्या मनात असलेली प्रतिमा होती ती फक्त छायाचित्रकाराची.
उद्धव ठाकरेंची क्रिएटिव्ह सौंदर्यदृष्टी त्यांच्या प्रत्येक छायाचित्रात झळकते. वन्यजीवांच्या छायाचित्रांसाठी तर ते खास ओळखले जातात. वाघ ही पक्षाची ओळख असणाऱ्या शिवसेनेचा हा पक्षप्रमुख जंगलातील खऱ्या वाघांनाही कॅमेऱ्यातून अधिकच प्रभावीरीत्या मांडतो. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा इतिहासप्रेमाचा वारसा छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या आकाशातून घेतलेल्या छायाचित्रांमधून टिपलाय. सात्विकतेच्या ऐलतीराचा आणि भक्तीच्या पैलतीराचा संगम असलेल्या वारीचा सांस्कृतिक रंगही अधिक प्रभावीरीत्या टिपलाय. मात्र हीच प्रतिमा जेव्हा त्यांच्या राजकारण प्रवेशानंतर टीकेचं कारण ठरु लागली. तेव्हा त्यांनी दाखवून दिलं की शिवसेनाप्रमुखांचा राजकीय नेतृत्वाचा वारसाही त्यांनी जपलाय.
शिवसेना राज्यात सत्तेवर असतानाच अनेक प्रकरणांनी सत्ता आणि शिवसेना अडचणीत येण्यास सुरुवात झाली. 1999 मध्ये शिवसेनेची सत्ता गेली. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या हाती जबाबदाऱ्या वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या समर्थपणे पेलल्याही. सुरुवात 2002 च्या मनपा निवडणुकीत सत्ता राखण्याचे आव्हान पेलून झाली...संयमी असलो तरी आक्रमक शिवसेनेला आपण पुढे नेऊ शकतो हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले....यश हे यशच असतं...महापालिकेत विजय मिळाला आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला मान्यता मिळण्यासही सुरुवात झाली.
महाबळेश्वरचं अधिवेशन उद्धव ठाकरेंच्या राजकीय नेतृत्वावर राजमुद्रा उठवणारं ठरलं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख म्हणून निवड करण्याचा ठराव मांडला आणि अर्थात उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकाडाटात तो मंजूर केला.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख झाले आणि त्यांची शिवसेनेवरील पकड मजबुत होण्यासही सुरुवात झाली. त्याचवेळी पक्षातील काही नेत्यांच्या कुरबुरीही सुरु झाल्या. शिवसेनेचे तत्कालिन नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तर टीका करत आघाडीच उघडली. अखेर शिवसेनाप्रमुखांनी सर्वांनाच हादरवणारा आदेश दिला...नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली आणि शिवसेनाच नाही अवघं राजकीय क्षेत्र हादरलं.
प्रथमच शिवसेनेला शिवसेना स्टाईलमध्येच आव्हान मिळू लागलं. ते दिवस सोपे नव्हते. रस्तोरस्ती संघर्ष. शिवसेनेचे आमदार, काही पदाधिकारी विरोधात गेले. कोकणासारख्या बालेकिल्ला गमावल्यातच जमा झाला. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या पद्धतीनं काम सुरुच ठेवलं. जराही अस्वस्थ न होता. त्यांनी शिवसेनेवरील आपली पकड जास्तच मजबूत करत नेली. टीम उद्धव उभी करुन...त्याचवेळी आणखी एक धक्का बसला...तो खरंतर दणकाच होता.
राज ठाकरेंची नवनिर्माणाची नवी वाट...शिवसेनेत बंडखोरी तशी नवी नव्हतीच उरलेली...मात्र ठाकरे कुटुंबातीलच कुणी असं करेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. मात्र तसं झालं...उद्धव ठाकरेंवरच पुन्हा खापर फोडलं गेलं. शिवसैनिकच नाही, मराठी मन अस्वस्थ झालं. मात्र उद्धव ठाकरे अविचल होते. त्यांनी जराही अस्वस्थता दाखवली नव्हती. संकट आले तरी उद्धव ठाकरे अस्वस्थ होत नाहीत, त्याचे कारण त्यांच्या कलाप्रेमात असावं.
मनसेच्या स्थापनेनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणूका आल्या. 2007 च्या त्या निवडणुकांच्या प्रचारकाळात मनसेचे इंजिन एवढं जोशात होतं की शिवसेना आपली सत्ता गमावते की काय असे वाटू लागले. त्यावेळी कामी आली ती उद्धव ठाकरेंनी केलेली संघटनात्मक बांधणी. शिवसेना तरली ती त्यामुळेच. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसला. आमदारांची संख्या 47 वर घसरली. तरीही उद्धव ठाकरे खंबीर राहिले. शिवसेनेला पुन्हा जोमाने उभे करून त्यांनी 2012 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला.
एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला राणे, राज यांच्यानंतरच्या पडझडीतून सावरले. आदित्य ठाकरेंच्या रुपाने एक ताजं रक्त सळसळवलं. शिवसेनेला पुन्हा एकदा झंझावाती वेगात आणण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एक असा आघात झाला...ज्याने साऱ्यांनाच हेलावून सोडलं.
मृत्यू अटळ असतो. मात्र, शिवसेनाप्रमुखाचं जाणं शिवसैनिक स्वीकारू शकले नाहीत. साहेब जाऊच कसे शकतात? ते आपल्यासोबतच आहेत, असा टाहो अष्टदिशांमध्ये ऐकू आला. मात्र त्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी स्वत:ला, कुटुंबाला अवघ्या शिवसेनेला सावरलं.
बाळासाहेब गेले... 17 नोव्हेंबर 2012 च्या त्या महाआघातातून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला पुढे नेलं. मात्र 2013 पासून देशात मोदींचा झंझावात उसळला. लोकसभा निवडणुकीत भाजपाशी युती होती. युतीने विक्रमी यश मिळवले. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपाने वेगळी वाट निवडली.
ते ते असतील तर आम्हीही आम्ही आहोत...शिवसेनेला कुणी कमी लेखू नये...अरेला कारे करणारी, मराठी माणसाला भावणाऱ्या शिवसेना स्टाईलमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाला...अमित शाहांना...नरेंद्र मोदींना अंगावर घेतले आणि मोदींच्या त्सुनामी लाटेला रोखत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवलं.
काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचं असल्याचं कारण देत उद्धव ठाकरेंनी विधानसभेत विखारी सामना देणाऱ्या भाजपासोबत सत्तेत भागिदारी स्वीकारली. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा वेगळी लढली. अटीतटीच्या लढाईत शिवसेनेने सत्ता राखली. त्याचं कारण उद्धव ठाकरेंमधील बाळासाहेबांच्या वारशाला असावं.
पुढे मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेत स्वगृही आणत उद्धव ठाकरेंनी बळ वाढवलं. तरीही भाजपाशी सत्तेत भागिदारी कायम राहिली. मात्र सामना संपला असे नाही. उलट सत्तेत असूनही सामना रोजचाच होऊ लागलाय. सत्तेत एकत्र आणि रस्त्यावर, मैदानात मात्र तोफा दणाणत असतात. आता तर काय आदित्य ठाकरेंचंही नेतृत्व स्वीकारलं गेलंय. त्याचबरोबर वन्यजीवनातील दुर्मिळपणाची आवड असणारा तेजसही सक्रीय होऊ लागलाय.
संघटनात्मक बांधणी, नियोजन यासाठी ओळखले जाणारे उद्धव ठाकरे शिवसेनेला अधिक गतीने पुढे घेऊन जाताना दिसतायत...शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नपूर्तीकडे...महाराष्ट्रावर शिवसेनेच्या सत्तेचा भगवा फडकवण्याच्या एकाच लक्ष्याकडे..!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement