Sanjay Raut : महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX
Sanjay Raut on Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. यावरून खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुंबईतील खारमधील शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं गायलं. कुणालनं गायलेल्या गद्दार नजर वो आए... या गाण्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली. कुणाल कामराविरोधात शिवसैनिकांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांनी देशाचं पोलीस स्टेट केला आहे. म्हणजेच पोलिसांच्या दबावाखाली असलेले राज्य तयार केले आहे. परंतु, महाराष्ट्र याला अपवाद आहे. महाराष्ट्रात गुंडा राज्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाल कामरा याने राजकीय व्यंग, टीकाटिपण्या आमच्या देखील केल्या आहेत. 50 ते 60 लोक जातात आणि स्टुडिओ फोडतात, या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे हे लक्षण आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पद सोडावं, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
मुंबई पोलीस काय करत होते?
संजय राऊत पुढे म्हणाले की, एक ब्रॉडकास्टर स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस झोपा काढत होते का? महाराष्ट्रात आणीबाणी लावलेली आहे का? ज्याप्रमाणे नागपूरमध्ये दंगलखोरांकडून नुकसान भरपाई भरून घेणार असल्याचे फडणवीस म्हणतात, त्याचप्रमाणे या दंगलखोऱ्यांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि त्यांचे नुकसान देणार की नाही? हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवत आहात. या गाण्यांमध्ये कोणाचाही उल्लेख नाही. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची ट्रान्सफर झाली पाहिजे. हा संपूर्ण कट दीड-दोन तास आधीच शिजला होता. मुंबई पोलीस काय करत होते? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
...तर अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील
ज्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला, त्या पोलीस स्टेशनमधले एसीपी आणि सीनियर पोलिसांवर देखील कारवाई केली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशामध्ये अपप्रचार होत आहे. धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरील व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे. फडणवीस यांना स्वतःची प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर दंगलखोरांवर कारवाई केली पाहिजे. विधिमंडळात जे चालले आहे ते ब्रॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला का नाही केला? ही गांXXX आहे. ज्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या प्रशांत कोरटकरवर हल्ला करा, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
