Prashant Koratkar : शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा; कोणी केली मागणी?
नागपूर महानगरपालिकेने हे बांधकाम बेकायदेशीर ठरवत फहीम खानला 24 तासांच्या आत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. हिंसाचारातील आरोपीच्या मालमत्तेवर महापालिका बुलडोझर चालवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Prashant Koratkar Threat Case : नागपुरातील हिंसाचाराचा सूत्रधार अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे नेता फहीम खानच्या घरावर आज (२४ मार्च) बुलडोझरची कारवाई करण्यात आली. फहीम खानच्या घरातील बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला. फहीम खान सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्या घराचा बेकायदेशीर भाग पाडण्यात आला. नागपूर महानगरपालिकेने हे बांधकाम बेकायदेशीर ठरवत फहीम खानला 24 तासांच्या आत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. हिंसाचारातील आरोपीच्या मालमत्तेवर महापालिका बुलडोझर चालवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारचे आभार मानताना शिवरायांवर गरळ ओकून फरार झालेला प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्या बेकायदेशीर बाबींची चौकशी करून बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान व खोक्या भोसलेच्या बेकायदेशीर घरावर कायदेशीर बुलडोजर चालवून धडा शिकविल्याबद्दल आभार. मात्र छ.शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवावे. त्यांनी जनभावना असाही टॅग ट्विटमध्ये वापरला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी 'कायदा परवानगी दिली तर बुलडोझर चालवू' असे म्हटले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी न्याय देण्याची पद्धत महाराष्ट्रातही अवलंबणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. आज सकाळी तोडक कारवाई करण्यात आली. फहीम खानची पत्नी जहिरुन्निसाच्या नावावर नोंदणीकृत असलेले हे 86.48 चौरस मीटरचे घर बेकायदेशीररीत्या बांधल्याची महापालिकेने 21 मार्च रोजी नोटीस बजावली होती.
नागपुरात संचारबंदी उठवली
नागपुरातील परिस्थिती पूर्णत: शांततापूर्ण असल्याने कर्फ्यू हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ते म्हणाले होते, “नागपुरातील परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. कुठेही तणाव नाही. सर्व धर्माचे लोक शांततेने एकत्र राहत आहेत, त्यामुळे संचारबंदी उठवण्यात आली आहे. 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबारा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची समाधी हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनादरम्यान पवित्र ग्रंथातील श्लोक असलेले पत्रक जाळण्यात आल्याची अफवा पसरल्यानंतर नागपूरच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.
नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 112 आरोपींना अटक
या हिंसाचारात पोलिस उपायुक्त दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांसह 33 पोलिस जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या संदर्भात शनिवारी सात जणांना अटक करण्यात आली असून, अटक केलेल्यांची एकूण संख्या 112 झाली आहे. यापूर्वी 20 मार्चला नंदनवन आणि कपिल नगर पोलिस स्टेशन परिसरातून आणि 22 मार्चला पाचपौली, शांती नगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामबारा परिसरातून कर्फ्यू हटवण्यात आला होता.




















