Nashik News : कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; नेमकं काय घडलं?
Nashik News : कुंभमेळ्याच्या आयोजनावरून साधू महंतांमध्ये दोन मत प्रवाह असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) आणि वाद हे समीकरण याही वेळी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण कुंभमेळ्याच्या आयोजनावरून साधू महंतांमध्ये दोन मत प्रवाह असल्याचे पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) आले असता त्यांची भेट घेतली होती. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असा प्रचार न करता त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी साधू-महंतांनी केली होती. मात्र, नाशिकच्या (Nashik) साधू-महंतांचा त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांच्या मागणीला आक्षेप आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जावा अशी मागणी नाशिकच्या साधू-महंतांनी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी ते सोवळे वत्र परिधान करून गर्भगृहात उतरले. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाची पूजा केली. त्यानंतर सभामंडपात संकल्प पूजा अभिषेक करण्यात आला. यानंतर फडणवीस यांनी साधू-महंतांशी सिंहस्थाबाबत चर्चा देखील केली. देवेंद्र फडणवीस यांनी साधू-महंतांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी साधू-महंतांनी त्र्यंबकेश्वर हे मुख्य स्थान असल्याने कुंभमेळा उल्लेख त्र्यंबकेश्वर-नाशिक असा करावा, पुढील कालावधीत स्वतः फडणवीस यांनी येथे पुन्हा यावे आणि प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करावे, त्र्यंबकेश्वरला आवश्यक असेल तर तोडफोड करावी व त्यामध्ये नुकसान होणार असले त्या ग्रामस्थांना पुरेपूर मोबदला देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी त्र्यंबकच्या साधू महंतांनी केली.
त्र्यंबकेश्वरमधून अशी मागणी करणे योग्य नाही : सुधीरदास पुजारी
त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी केल्यानंतर नाशिकच्या साधू-महंतांनी यावर आक्षेप घेतला. आज नाशिकच्या साधू-महंतांची मनपा आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असाच प्रचार करण्याची मागणी नाशिकच्या साधू-महंतांनी केली. याबाबत महंत सुधीरदास पुजारी म्हणाले की, व्याकरण दृष्ट्या नाशिक-त्र्यंबकेश्वर हेच नाव योग्य आहे. या आधीही नाशिक-त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जात होता. आता पुन्हा असा वाद नको. त्र्यंबकेश्वरमधून अशी मागणी करणे योग्य नाही. दोन्ही ठिकाणचे स्थान महात्म्य आहे, पण असा वाद नको. नाशिकमध्ये ही साधूंचे आखाडे आहेत. इथेही कुंभमेळा काळात स्नान होते. पेशवेकालीन निवाडा झाला असताना आता पुन्हा वाद उकरून काढू नये, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
























