बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर गोळीबार, राहुरीतील धक्कादायक घटना
बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. राहुरीतील ही धक्कादायक घटना असून सुदैवाने उप विभागीय अधिकारी संदीप मिटके हे बचावले आहेत.
शिर्डी : बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. राहुरीतील ही धक्कादायक घटना असून सुदैवाने उप विभागीय अधिकारी संदीप मिटके हे बचावले आहेत. गोळीबार करणारा पोलीस अधिकारी सुनील लोखंडे हा बडतर्फ आहे. माहितीनुसार बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. यातूनच धमकविण्यासाठी आरोपी सदर महिलेच्या घरी गेला असताना ही घटना घडली असल्याची माहिती आहे.
खंडणी बहाद्दर पोलिस सेवेतून बडतर्फ झालेला पुणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल लोखंडे याने राहूरी तालुक्यातील डिग्रस येथील ओलिस ठेवले. सदर कुटूंबाचे रक्षण करताना आरोपीने पोलिस अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस अधिकाऱ्याने मोठ्या धाडसाने त्याच्या पिस्टलवर ताबा मिळवत गोळीची दिशा बदलली खरी मात्र नेम चुकला नसता तर काय? मात्र आरोपीस सहकारी पोलिसाच्या मदतीने जेरबंद केलंय. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सुनिल लोखंडे याचे विरोधात राहुरी येथील एका महिलेने 30 सप्टेंबर रोजी विनयभंग, जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली होती त्यानंतर पिडीत महीलेच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून पती-पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतांना थोडीशी चूक महागात पडली असती. मात्र पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी झटापटीत मिटके बालंबाल बचावल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी सांगितलं आहे.
आरोपी सुनील लोखंडे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात आरोपीला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर आरोपीला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे."डिग्रस येथे एका घरात आरोपीने सकाळी प्रवेश करून, घरातील दोन मुलांना पिस्तुलाचा धाक दाखवून ओलीस ठेवले. त्याला ताब्यात घेतांना पोलीस उपअधीक्षक मिटके आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी बोलण्यात गुंतविले. त्याच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस अटक करतील. असे लक्षात आल्याने आरोपीने पोलीस उपाधीक्षक मिटके यांच्यावर गावठी पिस्तुल रोखले. मिटके यांनी आरोपीचा हात पकडला. या झटापटीत पिस्तुलातून एक गोळी सुटली. त्यात, मिटके बालंबाल बचावले. त्यापूर्वी, आरोपीने घरातील महिला आणि तिच्या पतीला धाक दाखविण्यासाठी एकदा गोळीबार केल्याचे निष्पन्न झालं.
आरोपीच्या ताब्यातून एक चार चाकी वाहन, दोन गावठी कट्टे व काही कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. आरोपीने पीडित महिलेची सोशल मीडियातून बदनामी केली होती. मागील आठवड्यात पीडितीने आरोपीविरुद्ध विनयभंग, खंडणी, अपहरण आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता याचा राग धरून आरोपी खून करण्याच्या उद्देशाने घरात शिरला होता. आरोपीविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्म ॲक्ट, ओलीस ठेवणे असे गुन्हे नोंदविण्याचे काम सुरू आहे असेही विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.