(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमित देशमुख यांनी मंत्री म्हणून कलाकारांच्या तोंडाला पाने पुसली; राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांचा गंभीर आरोप
मागच्या सरकारमधील सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांनी कलाकारांसाठी काहीचं कामं केलं नाही असा आरोप राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.
मुंबई: कोरोना कालावधीत 56 हजार कलाकारांना त्यांच्या खात्यात 5 हजार जमा करू असं आश्वासन देणाऱ्या माजी सांस्कृतिक मंत्र्यांनी अडीच वर्षात केवळ कलाकारांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं असा गंभीर आरोप राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे
बाबासाहेब पाटील म्हणाले की, "याबाबत अधिक बोलताना पाटिल म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन अडीच वर्षाचा कालखंड लोटला गेला. या सरकारने अनेक चांगले आणि लोकहिताचे निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात अनेक प्रकल्प मार्गे लागले. मात्र गेल्या अडीच वर्षात सांस्कृतिक खातं मात्र निष्क्रिय होत. कारण या खात्याला मिळालेल्या अमित देशमुख यांच्यासारख्या अरसिक आणि अकार्यक्षम मंत्र्यामुळे कलावंतांचे खूप मोठे नुकसान झाले."
कलावंतांच्या हिताचा कोणताही निर्णय नाही
आम्ही सतत अजित पवार आणि आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत या लोक कलावंताचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो असं सांगत बाबासाहेब पाटील म्हणाले की, "मराठी चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठीची धडपड असो, तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवून देण्याची प्रक्रिया असो, मुंबईमध्ये कलाकार भवन उभे करावे, लोक कलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासाठीचा सतत पाठपुरावा करत राहिलो. यासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीदेखील सतत अमित देशमुख यांना भेटून विविध निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले. तरीदेखील अमित देशमुख यांनी कुठलेही कलावंत हिताचे निर्णय न घेतल्यामुळे गेल्या अडीच वर्षात अनेक कलावंतांना विविध उपयोजनांपासून वंचित राहावे लागले."
करोना काळामध्ये 56 हजार कलाकारांना त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील फेल गेल्याचा आरोप बाबासाहेब पाटील यांनी अमित देशमुखांवर केला आहे. ते म्हणाले की, "वृद्ध कलावंतांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव तसेच मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भात निर्णय अजितदादा यांनी तत्काळ मार्गी लावला होता. मात्र अमित देशमुख यांच्या कार्यालयाकडे कलावंताच्या मानधन वाढीचा प्रस्ताव, मराठी चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव पडून राहिल्यामुळे शेवटी सरकार गेलं तरीही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही."
या आधीचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी हा विषय अडीच वर्षात एकदाही मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये घेतला नसल्याचा आरोप बाबासाहेब पाटील यांनी केला. अमित देशमुख यांच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच कलाकारांचे खूप मोठे नुकसान झाले असे खेदजनक आम्हाला बोलावेसे वाटते, राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यशैलीमध्ये आणि अमित देशमुख यांच्या कार्य शैलीमध्ये जमीन आस्मानचा फरक या ठिकाणी दिसून येतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.