Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्यासोबतच आहेत, असे स्पष्टीकरण किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी दिले आहे.

Mamta Kulkarni : बॉलीवूडअभिनेत्री ममता कुलकर्णींनी (Mamta Kulkarni) यंदाच्या महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला. पूर्ण विधींसह दीक्षा घेतल्यानंतर त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले. त्यानंतर त्यांचे नावही बदलले आणि त्या यमाई ममता नंद गिरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र, या संपूर्ण प्रकरणावरून इतका वाद झाला की, त्यांनी राजीनामा दिला होता; पण तो स्वीकारला गेला नाही. आता ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्यासोबतच आहेत, असे स्पष्टीकरण किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Laxmi Narayan Tripathi) यांनी नाशिक (Nashik News) येथे पत्रकार परिषदेत दिले आहे.
नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्याची पत्रकार परिषद परिषद पार पडली. यात किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी यांच्याबाबत वक्तव्य केले. तसेच कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? यावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांमध्ये वाद सुरु झाला आहे. यावरदेखील त्यांनी भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाल्या किन्नर आखाड्याच्या प्रमुख?
लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी म्हटलंय की, ममता कुलकर्णी त्र्यंबकेश्वरमध्ये आमच्यासोबत कुंभमेळ्यामध्ये राहतील. काही जणांनी विनाकारण तेव्हा हा वाद पुढे आणला होता. आगामी कुंभमेळ्यात आमचा किन्नर आखाडा त्र्यंबकेश्वरमध्ये राहणार आहे. आमच्या आखाड्यासाठी सरकारने जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी किन्नर आखाड्यातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्हा असल्याने कुंभमेळा नाशिक नावाने ओळखले जावा, असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान किन्नर आखाडा यंदाच्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये सहभागी होणार नाही, किन्नर आखाडा त्र्यंबकेश्वरमध्ये राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? साधू-महंतांमध्ये मतप्रवाह
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी ते सोवळे वस्त्र परिधान करून गर्भगृहात उतरले. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाची पूजा केली. त्यानंतर सभामंडपात संकल्प पूजा अभिषेक करण्यात आला. यानंतर फडणवीस यांनी साधू-महंतांशी सिंहस्थाबाबत चर्चा देखील केली. देवेंद्र फडणवीस यांनी साधू-महंतांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी साधू-महंतांनी त्र्यंबकेश्वर हे मुख्य स्थान असल्याने कुंभमेळा उल्लेख त्र्यंबकेश्वर-नाशिक असा करावा, अशी मागणी केली. त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी केल्यानंतर नाशिकच्या साधू-महंतांनी यावर आक्षेप घेतला. नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असाच प्रचार करण्याची मागणी नाशिकच्या साधू-महंतांनी केली आहे. यामुळे नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? यावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांमध्ये वाद सुरु झाला आहे.
आणखी वाचा























