Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
Kunal Kamra : कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गायलेल्या गाण्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Nilesh Lanke on Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुंबईतील खारमधील शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं गायलं. कुणालनं गायलेल्या गद्दार नजर वो आए... या गाण्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर खार पोलिसांनी 11 शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मात्र, यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांनी वेगळंच मत मांडलं आहे.
एखाद्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने आक्षेपार्ह गाणं किंवा वक्तव्य करणं हे चुकीचं असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. नेता कुठल्याही पक्षाचा असो किंवा विचारांचा असो, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे.
बुलडोझर संस्कृती त्वरित थांबवावी
नागपूर दंगल प्रकरणात आरोपी असलेल्या फईम खान याच्या घरावर महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली असून बुलडोझरने घर पाडण्यात आल आहे. यावर अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली असून दंगल घडवून आणणाऱ्यांना किंवा दंगलीतील दोषी असणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, आपल्या विरोधातील व्यक्तीच्या बाबतीत कुठेतरी कागदपत्राचा फार्स करून बुलडोझर फिरवणं हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात नव्यानेच सुरू झालेली बुलडोझर संस्कृती त्वरित थांबवणे गरजेचे आहे, असंही निलेश लंके म्हणाले.
सुपा आणि नगर भागात विमानतळ गरजेचं
अहिल्यानगर येथे अनेक दिवसांपासून विमानतळाची मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता खासदार निलेश लंके यांनी पुढाकार घेत विमानतळासाठी मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. सुपा आणि नगर भागात औद्योगिकरण असल्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांना विमानतळ गरजेचं असल्याचं लंके यांनी म्हटले आहे. तसेच मुंबई ते अहिल्यानगर अशी हेलिकॉप्टर सेवा सुरू व्हावी, अशी मागणी देखील निलेश लंके करणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
