Measles Disease : चिंताजनक! राज्यात आतापर्यंत 20 बालकांचा मृत्यू; तर 16,597 संशयित रूग्ण
Measles Disease : मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी राज्यात गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे.
Measles Disease : राज्यात गोवरचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गोवरचा उद्रेक थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. दररोज गोवरचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात चिंता वाढू लागली आहे. आज राज्यात गोवरचा उद्रेक 139 पटींनी वाढला आहे. तर, 16 हजार 597 संशयित रूग्ण आढळले आहेत.
गोवरची वाढती संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रूबेला लसीकरण अभियानाची 15 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील गोवर रूबेला लसीचा डोस चुकलेल्या बालकांना 28 दिवसांच्या अंतराने डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार, आतापर्यंत पहिला डोस 14,952 बालकांना देण्यात आला आह. तर, दुसरा डोस 14,595 बालकांना देण्यात आला आहे.
राज्यातील गोवरची परिस्थिती
मागील चार वर्षांची राज्याची गोवरची परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजेच 2022 या वर्षातील गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक तीन पटींनी झाला होता. तर, 2020 मध्ये गोवरचा उद्रेक दोन पटींवर होता. 2021 मध्ये तर गोवर बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजेच एक पटींनी वाढली होती. 2022 मध्ये गोवर आजाराने कहरच केला आहे. ही संख्या आता 139 पटींनी वाढली आहे.
गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? (Symptoms of Measles Infection) :
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवर हा आजार मुख्य करून पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळून येतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येण्यास सुरुवात होते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भीती असते.
संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?
या आजारावर अत्यंत प्रभावी अशी MR आणि MMR अशी लस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन डोस देण्यात येतात. 9 महिने आणि 15 महिने वयोगटात या आजाराचे दोन डोस देण्यात येतात. त्याचबरोबर सेफ ड्रिकींग वॉटर, अजीवनसत्वाची मात्रा, सकस आहार, कुपोषण, कुपोषणावरील उपचार अशी उपाययोजना करून आपण ही साथ थांबवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
Aurangabad: औरंगाबादमध्ये गोवरच्या आणखी 14 संशयित रुग्णांची भर, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले