मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच 'नीट'च्या परीक्षेत माल प्रॅक्टिस होण्याची भीती एप्रिलमध्येच व्यक्त करण्यात आली होती.
लातूर : देशात पेपरफुटीच्या घटनांनी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परीक्षांच्या घोळासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना सरकारला गळती लागल्याचं म्हटलं आहे. कारण, देशातील नीट (NEET) परीक्षेमधील गैरप्रकाराचे थेट कनेक्शन हे महाराष्ट्रात शिक्षणाचा पॅटर्न सांगणाऱ्या लातूर जिल्ह्यात आढळून आले आहे. याप्रकरणी, पोलिसांनी लातूरमधून (Latur) दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुण वाढवण्याचं आमिष दाखवून अनेक पालकांकडून प्रत्येकी 4 ते 5 लाख रुपये उकळल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला. या रॅकेटमध्ये सहभागाच्या संशयावरून पोलीस कोठडीत असलेला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय जाधव, जलील पठाण यांच्या तपासातून आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. दुसरीकडे लातूरमधील महाविद्यालयाच्या संचालकांनी मोठा दावा केला आहे. त्यामध्ये, एनटीएला (NTA) याबाबतची माहिती एप्रिल महिन्यातच दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच 'नीट'च्या परीक्षेत माल प्रॅक्टिस होण्याची भीती एप्रिलमध्येच व्यक्त करण्यात आली होती. कारण, महाराष्ट्रातील मुलं कर्नाटक, गुजरात, बिहार या भागात जाऊन परीक्षा देत आहेत. याबाबत एनटीएला पत्र व्यवहारही केला होता. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही, असा खुलासाच लातूरमधील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे संचालक दिलीप देशमुख यांनी केला आहे.
महाराष्ट्रात गाजलेल्या लातूर पॅटर्नचं नावलौकिक शहरातील अनेक महाविद्यालयामुळे तयार झाले आहे, त्यातील एक महाविद्यालय म्हणजे राजश्री शाहू महाविद्यालय आहे. राजश्री शाहू महाविद्यालयातील नीट सीईटी सेलचे संचालक दिलीप देशमुख यांनी एप्रिल महिन्यामध्ये एनटीएला पत्र पाठवलं होतं. महाराष्ट्रातले अनेक असे विद्यार्थी आहेत जे कर्नाटक, गुजरात, बिहार अशा राज्यामध्ये नीटची परीक्षा द्यायला जातात. यात रिपीटर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्यांना भरघोस मार्क मिळालेलीही अनेक उदाहरणं आहेत, असा मोठा दावा दिलीप देशमुख यांनी केला आहे. तसेच, या सर्व घटनांवरुन आम्हाला शंका आली होती. कारण, जे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यापासून दीड-दोन हजार किलोमीटर लांब जाऊन परीक्षा देत आहेत, त्या मागची नेमकं कारण काय?. जर असे प्रकार वारंवार होत असतील तर जे विद्यार्थी दोन वर्षे प्रचंड मेहनत करतात त्यांची गुण कमी असल्यामुळे त्यांना योग्य महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता त्याची खोलवर चौकशी झाली पाहिजे होती, अशी खंतही देशमुख यांनी एनटीएबद्दल व्यक्त केली. परीक्षा पद्धतीत बदल होणं आवश्यक आहे. तरच अशा प्रकारच्या माल प्रॅक्टिस बंद होतील, असेही मत दिलीप देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले आहे.
जिल्ह्याजिल्ह्यात अनेक सब एजंट
पोलीस कोठडीत असलेला जिल्हा परिषद शाळेच शिक्षक संजय जाधव, जलील पठाण यांनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली. नीट परीक्षेच्या घोटाळ्यात जिल्ह्याजिल्ह्यात अनेक सब एजंट कार्यरत असल्याची कबुलीही आरोपी शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान, यापैकी 28 जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, यातीलच काहींनी आपल्या पाल्यांसाठीही पैसे दिले असल्याचा खुलासा आरोपींकड़ून झाला आहे. पोलीस कोठडीत असलेला जलील पठाण आणि संजय जाधव यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची बरीच माहिती पोलिसांना दिली. गेल्या 3 ते 4 वर्षांत पठाण आणि जाधवसारखे अनेक एजंट लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातही कार्यरत आहेत. त्यांनी जे पैसे जमा केले, त्या विद्यार्थ्यांचे गुणही वाढवून देण्यात आल्याचा दावा या दोघांनी केला आहे. इतकंच नव्हे तर इतर सरकारी नोकरभरती प्रक्रियेतील परीक्षेतही हे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा