NEET : लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड
NEET Paper Leak Case : नीट परीक्षा देण्यासाठी सेंटर निवडण्याची जी प्रक्रिया आहे तिथून यामध्ये गैरकारभार सुरू होत असतो हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आरोपींकडून ज्या सेंटरवर घोळ होतो त्याचीच निवड होत असल्याचं समोर आलं.
NEET Paper Leak Case : लातूर पोलिसांना नीट प्रकरणातील आरोपींकडून 14 अॅडमिट कार्ड (NEET Admit Card) मिळाले आहेत. या अॅडमिट कार्डची तपासणी केल्यानंतर यातील काही अॅडमिट कार्ड हे बिहारचे असल्याचे उघड झालं आहे. लातूर पोलिसांनी याबाबत बिहार पोलिसांशी संपर्क करून बिहार कनेक्शन असलेल्या अॅडमिट कार्ड आणि त्याची माहिती त्यांना दिली आहे. याप्रकरणी 14 लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षण लातूरमध्ये घेतात मात्र नीटची परीक्षा काही ठराविक सेंटरला देण्यासाठी जात असतात. त्या सेंटरमध्ये अनियमितता, घोळ करून परीक्षा दिली जाते. सापडलेल्या 14 पैकी किती अॅडमिट कार्ड बिहारचे आहेत याची ठोस माहिती उपलब्ध नाही.
लातूर नीट पेपर फुटी प्रकरणी विविध विषय चर्चेला येत आहेत. त्यात नीट परीक्षा देण्यासाठी सेंटर निवडण्याची जी प्रक्रिया आहे तिथून यामध्ये गैरकारभार सुरू होत असतो हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काही मुलांकडून असे सेंटर निवडले जातात की ज्या सेंटरवर अनियमितता, घोळ करता येतो.
या सेंटरमध्ये परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याची शक्यता असते. यात ज्यांच्याबरोबर व्यवहार ठरलेत त्यांच्यापर्यंत पेपर पोहोचवण्याचं काम केलं जातं. तसेच परीक्षा झाल्यानंतर गुण वाढवून देण्यासाठीही व्यवहार केला जात असल्याचं समोर आलं आहे.
नीट प्रकरणाची पाळेमुळे लातुरात
देशात नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं उघडकील आल्यानंतर त्याची पाळेमुळे लातुरामध्येही असल्याचं सिद्ध झालं. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुण वाढवण्याचं आमिष दाखवून अनेक पालकांकडून प्रत्येकी 4 ते 5 लाख रुपये उकळल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला. या रॅकेटमध्ये सहभागाच्या संशयावरून पोलीस कोठडीत असलेला जिल्हा परिषद शाळेच शिक्षक संजय जाधव, जलील पठाण यांनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली.
नीट परीक्षेच्या घोटाळ्यात जिल्ह्याजिल्ह्यात अनेक सबएजंट कार्यरत असल्याची कबुलीही आरोपी शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान यापैकी 28 जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र यातीलच काहींनी आपल्या पाल्यांसाठीही पैसे दिलेले असल्याचा खुलासा झाला आहे.
पोलीस कोठडीत असलेला जलील पठाण आणि संजय जाधव यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची बरीच माहिती पोलिसांना दिली. गेल्या 3 ते 4 वर्षांत पठाण आणि जाधवसारखे अनेक एजंट लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातही कार्यरत आहेत. त्यांनी जे पैसे जमा केले, त्या विद्यार्थ्यांचे गुणही वाढवून देण्यात आल्याचा दावा या दोघांनी केला आहे. इतकंच नव्हे तर इतर सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेतही हे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आरोपी शिक्षक जाधव आणि पठाण यांच्याकडून पैसे घेऊन ते दिल्लीपर्यंत पोहोचवणारा उमरगा, आयटीआयमधील सुपरवायझर इरन्ना कोनगलवार आणि दिल्लीतील एजंट गंगाधर हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. गंगाधर गुंडे हा मूळचा मराठवाड्याचा असून उत्तराखंडमध्ये लपून बसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे गंगाधर गुंडेला पोलिसांनी अटक केल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे.
ही बातमी वाचा: