Nana Patole : आजपासून काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत, जनतेच्या प्रश्नांवर काम करणार : नाना पटोले
महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसची आज महत्वाची बैठक होणार आहे. काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
Nana Patole : आमचं आता एक पात्र संपलं असून, आता विरोधकांचं पात्र सुरु झालं आहे. पुढील रणनिती काय असणार याबाबत आम्ही आमदारांसोबत चर्चा करणार आहोत. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस कायम काम करणार आहे. काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत, त्यांना शुभेच्छा असल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. त्यानंतर काँग्रेसचा पुढचा काय प्लॅन असणार? पुढची वाटचाल कशी करायची याबाबत काँग्रेसची महत्वाची बैठक आज आयोजीत करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नाना पटोले यांनी दिली. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम काँग्रेस कायम करणार असल्याचे पटोले म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजीचं काही कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा आधीच निर्णय झाला होता असेही पटोले यांनी सांगितले. त्यादृष्टीने आमची तयारी सुरु आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीनं जनतेचे प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली आहे. चांगले काम आमच्या सरकारनं केली आहे. विरोधी पक्ष म्हणून आमच्या अजेंड्यावर खूप सारे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न समोर आहेत. केंद्र सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून जो चना खरेदी केली जातो तो खरेदी केला नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आहे. दुबार पेरमीचं सकंट शेतकऱ्यावर आलं आहे. ओबीसींचे प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत. त्यावर आम्ही काम करणार असल्याचे पटोले म्हणाले.
10 दिवसानंतर राजकीय नाट्यावर पडदा
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाल. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं. आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला.