Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
Thane Crime : डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यातर्गत एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. यात 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याचे समोर आले आहे.

Thane Crime : डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यातर्गत एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. यात 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. मात्र या चिमुकल्याचा शोध घेत पोलीसांनी अवघ्या साडेतीन तासात शोध लावत सुखरुप सुटका केली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुलाच्या आईने अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना दिली असता, पोलिसांनी तातडीने वेगवेगळे पोलिसांचे सात पथक तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना अपहरणकर्ते शहापूर-नाशिक हायवेकडे असल्याचे समजले. यावर मानपाडा पोलिसांनी शहापूर पोलिसांची मदत घेत अपहरण कर्त्यांवर पोलिसांनी झडप घालुन मुलाची सुखरूप सुटका केली आहे.
2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण
नेहमीप्रमाणे रिक्षेतून मुलगा शाळेत गेला होता, मात्र शाळा सुटल्यावर मुलगा घरी वेळेत आला नाही. या चिंतेने मुलाच्या आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्या दरम्यान मुलाचे वडील महेश भोईर यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीने भोईर यांना फोनद्वारे सांगितले की, माझ्या भावाचे अपहरण झाले आहे. तुम्ही त्याला फोन करा. त्यावर मुलाच्या वडिलांनी विरेन पाटील याला फोनद्वारे संपर्क साधला. त्यावेळी विरेन पाटील याने भोईर यांना सांगितले आमचे अपहरण झाले आहे, हे लोक पैसे मागत आहेत आणि बोलतात पैसे न दिल्यास तसेच पोलीसांना कळविल्यास मुलास जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत.
अवघ्या साडेतीन तासात अपहरण झालेल्या मुलाची सुटका
या गंभीर घटनेबाबत महेश भोईर आणि त्यांच्या पत्नीने डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना अपहरणाची संपूर्ण माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांची 7 वेगवेगळी तपास पथके तयार करुन अपहरण कर्त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तपासादरम्यान मुलाला शाळेत घेवुन जाणारा रिक्षाचालक विरेन पाटील याचा पोलिसांना संशय आला. त्याअनुषंगाने पोलिसांना विरेन विषयी तांत्रीक माहिती प्राप्त केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन विरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढून अवघ्या साडेतीन तासात अपहरण झालेल्या मुलाची शहापुर येथून सुखरुप सुटका केली. अपहरण झालेल्या मुलाला आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांनी दोघांना अटक करून या घटनेत आणखी आरोपी असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे. दरम्यान, अवघ्या तीन तासात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे मुलाचे वडील महेश भोईर यांनी आभार मानले.
हे ही वाचा
























