Dhule : गेल्या 45 वर्षांपासून धुळे कृषी महाविद्यालयात लाल सिंधी गाईंचे संवर्धन; राज्यातील एकमेव उपक्रम
धुळे कृषी महाविद्यालयात गेल्या 45 वर्षांपासून लाल सिंधी या गाईंचे संवर्धन करण्यात येतंय. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे हे एकमेव कृषी महाविद्यालय आहे.
धुळे : भारतात गाईला देवाचा दर्जा दिला जातो. हिंदू संस्कृतीत गाईचे पूजन करणं म्हणजे देवाचे पूजन अशी समजूत आहे. त्यामुळे गाईच्या संवर्धनावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. अशाच अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या लाल सिंधी गाईंचे उत्तर महाराष्ट्रात धुळे कृषी महाविद्यालयात गेल्या 40 ते 45 वर्षांपासून संगोपन केले जात आहे. अशा प्रकारच्या लाल सिंधी गाईंचे संवर्धन करणारे धुळे कृषी महाविद्याल हे राज्यातील एकमेव महाविद्यालय आहे.
भारतात दूध उत्पादन करणाऱ्या देशी गाईंच्या जाती गीर सहिवाल, लाल सिंधी, थारपारकर आणि राठी या आहेत. या देशी गोवंश गाईंपैकी लाल सिंधी जातीच्या गाईंची संख्या भारतात फक्त 2 हजाराच्या आसपास आहे. या देशी गाई मध्यम आकाराच्या, हाताळण्यास सोप्या आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणाऱ्या आहेत. लाल सिंधी गाईंचा रंग तांबूस विटकरी असतो.
लाल सिंधी या जातीच्या गाईंचे देशात सेंट्रल कॅटल ब्रीडिंग फार्म चीपलिमा ओरिसा, डिस्ट्रिक लाईव्ह स्ट्रॉक फार्म होसुर तामिळनाडू, गोवा लाईव्हस्ट्रॉक फार्म गोवा, कृषी महाविद्यालय धुळे महाराष्ट्र, कॅटल ब्रिडींग फार्म कालसी उत्तरांचल या ठिकाणी संवर्धन केले जाते.
लाल सिंधी गाईंची दैनिक दूध उत्पादन क्षमता दहा ते बारा लिटरच्या आसपास असून विशेष म्हणजे 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात देखील या गाई उत्तम तग धरू शकतात. उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्यवर्धक अशी या गाईंची ओळख असून या गाईंचे दूध आरोग्यासाठी उत्तम असते. धुळे येथील कृषी महाविद्यालयात 50 लाल सिंधी गाईंचे संवर्धन नैसर्गिकरित्या केले जात आहे. या गाईंच्या दुधावर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात.
अत्यंत दुर्मिळ जातीच्या या गाईंच्या संवर्धनासाठी मात्र राज्य शासनामार्फत कोणतेही अनुदान धुळे येथील कृषि महाविद्यालयाचा दिले जात नाही. त्यामुळे या संवर्धनासाठी कृषी महाविद्यालयाला अनुदान देण्यात यावं अशी मागणी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :