(Source: ECI/ABP News/ABP Majha)
थंडीचा कडाका वाढला; धुळ्यात तापमान 7.6 अंशावर, तर बुलडाण्यात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम
पुढील दोन दिवसात वायव्य भारतात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम आहे. राज्यात धुळे जिल्ह्याचा पारा पुन्हा 3 अंशांनी घसरला आहे.
IMD Weather Forecast Updates : पूर्व भारत आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. तर पुढील चार ते पाच दिवसात उत्तर भारतात आणखी दाट धुके पडणार असल्याचे सांगितले आहे. पुढील दोन दिवसात वायव्य भारतात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम आहे. राज्यात धुळे जिल्ह्याचा पारा पुन्हा 3 अंशांनी घसरला आहे. काल 10.05 अंशावर असलेले तापमान आज पुन्हा 7.6 अंशावर येऊन पोहोचल्याने कडाक्याच्या थंडी पडली आहे. तर बुलडाणा जिल्ह्याच्या सर्वच भागात दाट धुक्याची चादर पसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दाट धुके पडल्याने जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.06 वर वाहतुकीला ब्रेक लागला आहे. तसेच रेल्वे सेवासुद्धा प्रभावित झाली असल्याची माहिती मिळत आहे. या दाट धुक्यामुळे मात्र हरभरा, गहू इत्यादी पिकांवर परिणात होण्याची शक्यता आहे.
आज पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील तीन दिवसांत वायव्य भारतातील किमान तापमानात बदल होणार नाही आणि त्यानंतर 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील तीन दिवसात पूर्व भारतात हावामानात बदल होणार नसून, त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर येत्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये थंडीची लाट येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवसांत, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागांमध्ये जास्त थंडी पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीचा जोर वाढणार आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थान, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम त्रिपुरा, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली या ठिकाणी दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवसात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये सकाळी आणि रात्री धुके पडण्याची शक्यता आहे.