Pre Monsoon Rain : राज्यातील 'या' भागात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांच्या फळपिकांना मात्र फटका
काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.

Pre Monsoon Rain : राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आह. तर दुसरीके वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बळीराजाला मात्र फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. पाहुयात कुठे कुठे झाला पाऊस..
पंढरपूर परिसरात फळबागांचे नुकसान
पंढरपूर परिसरात वादळी वारे आणि पावसाने द्राक्ष बेदाणे शेड उध्वस्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. तर शेवग्याची झाडे पडली आहेत. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकरी शिवाजी हळणवर यांच्या बेदाणा शेडवरील पत्रे व कागद उडाल्याने सहा लाख रुपयांच्या तीन टन बेदाण्याचे नुकसान झाले आहे. तर पळशी येथील शेतकरी शेवाळे यांची दोन एकरावरील शेवग्याची बाग जमिनदोस्त झाली आहे. यामध्ये त्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन द्राक्ष काढणी हंगामात वादळी वारे आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. पटवर्धन कुरोली येथे जवळपास 50 एकर वरील केळीच्या बागा आडव्या झाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.
अहमदनगर
अहमदनगर शहरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होताच विद्युत पुरवठा खंडित झाला. विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुले उकड्यापासून नगरकरांची सुटका झाली आहे, मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरू असल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.
वाशिम
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, वाशिमच्या काही भागात जोरदार मान्सून पूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली . जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने काही प्रमाणात तापमानाचा पारा घसरला होता. अशात पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगलीत मुसळधार पावसाची हजेरी
सांगलीत सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मागील दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाला होता. ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना पावसाने हजेरी लावली.
वर्धा
वर्धा शहरासह जवळील गावात विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
चिपळूण रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. सकाळपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
इंदापूर
इंदापूर शहरासह तालुक्यात दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या काही भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहिसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.
जालना जिल्ह्यात पावसाची हजेरी
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला, तालुक्यातील खादगाव, मांडवा ,पांगरी, आणि शेलगाव येथे हा जोरदार पाऊस बरसला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा का होईना दिलासा मिळाला आहे.
बुलढाणा पाऊस
जिल्ह्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. देऊळगाव राजा , जळगाव जामोद , शेगाव तालुक्यात पावसानं हजेरी लावली. देऊळगाव राजा नगरपरिषदेने नाले सफाई न केल्याने अनेकांच्या घरासमोर पाणी साचलं. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
