(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ
Manoj Jarange : छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिला आहे.
रायगड : मराठा आरक्षणाचबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) विरुद्ध ओबीसी नेते असा वाद आता टोकाला पोहचला आहे. अशात आता मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्हाला ओबीसी बांधवांच्या लेकरांचं वाटोळ करायचं नाही. गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात माती कालवायची नाही. मात्र, तो (छगन भुजबळ) जर आमच्या अन्नात माती कालवत असेल, तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळे होत असल्याचं गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे. नाईलाजाने मला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल. कारण त्यांचा सुद्धा कोणताही अहवाल स्वीकारलेला नाही. आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास हे आणून द्यावा लागेल. त्यामुळे त्यांचा देखील देशातील संपूर्ण 27 टक्के आरक्षण रद्द होऊ शकते. हे फक्त त्याच्या एकट्यामुळे (छगन भुजबळ) एवढ्या लोकांचा वाटोळं होऊ शकतं, असे जरांगे म्हणाले.
नाईलाजाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करावी लागणार...
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,"आमचं हक्काचा आरक्षण आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. त्यामुळे आमच्या अन्नात त्याने माती कालवण्याचं प्रयत्न करू नये. गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावं. अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा,” दावा जरांगे यांनी केला आहे.
तो आता बधिर झाला आहे...
कुणी कार्यक्रम घ्यावा किंवा नाही घ्यावा हा लोकशाहीने अधिकार आहे. मात्र, येवल्याचा तो जसा इकडं तिकडं फिरतो त्याप्रमाणे आम्ही नाही. त्यांनी कार्यक्रम घेतला म्हणून आम्ही घ्यायचं यात आम्ही मोडत नाही. तो आता बधिर झाला आहे. मराठा समाजाला आरक्षणात येऊ द्यायचं नाही हे त्याचं स्वप्न होतं. आता दोन करोड मराठे आम्ही आरक्षणात नेऊन घातले. थोडे राहिले ते देखील जाणार आहे. त्यामुळे तो पागल झाला आहे. माझं काही चालत नसल्याचं त्याला वाटत आहे. त्याची नियतच खराब आहे. आमच्या कालच्या कायद्यामुळे ओबीसी समाजातील सर्वच सगेसोयऱ्यांना देखील फायदा होणार आहे. आमची नियत खराब नाही, अन्यथा सगेसोयरे कायदा फक्त मराठा समाजापुरता केला असता. गोरगरीब ओबीसींचा कल्याण होत असेल तर होऊ द्या अशी आमची भावना आहे. पण, त्याचं तसं नाही, तो झालाय पागल, त्याच्यामुळे ओबीसींनी त्याच्या नादी लागू नये अशी माझी विनंती असल्याचं जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: