... त्याक्षणी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, जरांगेंबाबतच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचं आहे, मग सगेसोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ते होऊ देत नाहीत असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे.
मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं असून मराठा आंदोलक आता सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आरक्षणाबाबतचा जाब विचारत आहेत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय असे प्रश्न थेट गाडी अडवून आणि व्यासपीठावर जाऊन विचारले जाऊ लागले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असून ते महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते सडकून टीका करतात, तसेच गंभीर आरोपही करताना दिसून येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काम करुन इच्छितात पण देवेंद्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नाहीत, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला आहे. आता, जरांगेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक शब्दात उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचं आहे, मग सगेसोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ते होऊ देत नाहीत असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांचं (Manoj Jarange) माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात, इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो. शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर माझं मत आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन.
एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा शिंदे साहेबांनी केले. शिंदे साहेबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, तर मी राजीनामा देईनच , पण राजकारणातून देखील संन्यास घेईन, असा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला.
निवडणूक घोषणेचं राजकारण करणं चुकीचं
निवडणुका कोण घोषित करतं, त्यांचे अधिकार काय आहेत, हे ज्यांना माहिती नाही असे लोकंच अशाप्रकारचे आरोप लावतात. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित करताना त्यांनी महाराष्ट्राबाबतही भाष्य केलंय. मात्र प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं चुकीची आहे.
मी रामदास कदमांचं म्हणणं ऐकून घेईन
रामदास कदम यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत, मुंबई-गोवा महामार्गाची डेडलाईन ते पाळत नाहीत, असेही कदम यांनी म्हटलंय, याबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. रामदास कदमांनी प्रत्येकवेळी भाजपवर आरोप करणं योग्य नाही, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते अंतर्गत पद्धतीने मांडलं पाहिजे. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेईन आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, असेही फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा
Video : आईच बनली लेकाची ढाल; कोल्हापुरातील तलवार हल्ला घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल