Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात बसचालक मद्यधुंद अवस्थेत, फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक माहिती समोर
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचालक संदर्भात धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं धक्कादायक वास्तव अहवालात समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, ही माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे.
बुलढाणा बस अपघात मद्यधुंद चालकामुळेच?
समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते.
बसचालकाच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण जास्त
अमरावती मधील रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने दिलेल्या अहवालाप्रमाणे, ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्तात मान्य प्रमाणापेक्षा 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट (BAC) म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण 100 मिलिलीटर रक्तात 30 मिलीग्राम अल्कोहोल एवढं आहे. मात्र, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे 1 जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.
23 मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर
रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) दिलेल्या माहितीनुसार, 23 मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर आले असून अद्याप दोन मृतदेहांचे अहवाल प्रलंबित आहेत. डिझेलमुळे आग लागली आणि ती वेगाने पसरली. त्यामुळे 25 बळींना बचावण्याची संधीच मिळाली नाही. फॉरेन्सिक अहवालात टायर फुटल्यामुळे अपघात झाला का याची शक्यताही तपासण्यात आली. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले. पण, निष्कर्षावरून ही शक्यता फेटाळण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या त्या बसचा अपघात 30 जून आणि 1 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास झाला होता. फॉरेन्सिक टीमने बस ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्ताचे सॅम्पल 1 जुलैला दुपारच्या सुमारास घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झालं असावं असे तज्ज्ञांना वाटतं. म्हणजेच अपघात घडला त्यावेळेस ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण अहवालात नमूद करण्यात आलं, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याची शक्यता आहे.
बसचालकाला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा?
पुराव्यांवरून असं समोर आलं आहे की, अपघातावेळी ड्रायव्हर झोपला होता आणि त्यामुळे बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला. आयपीसी कलम 304 अन्वये बसचालकावर दोषी हत्येसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रायव्हर दानिशच्या रक्त अहवालामुळे त्याला दोषी ठरवलं जाऊ शकतं, परिणामी त्याला 10 वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
