एक्स्प्लोर

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरच्या बस अपघाताचं 'रिपोर्टिंग': एका पत्रकाराची 'अस्वस्थ डायरी' 

Samruddhi Highway Accident: 30 जूनची रात्र संपून 1 जुलै सुरू झाला होता... जूनमधील असह्य असा उकाडा... पावसानं फिरवलेली पाठ... त्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी असं अनिश्चितेचं 'मळभ' सरत्या जूनमध्ये दाटलं होतं. 30 जूनच्या रात्री झोपी जाताना येणाऱ्या जुलैमध्ये 'हिरवाई'च्या 'आबादानी'चं आश्वासक स्वप्नं मनात साठवत झोपी गेलो... अगदी साखरझोपेत असतांना पहाटे माझ्या मोबाईलची 'रिंगरिंग' सुरू झाली. इतक्या रात्रीच्या फोननं काहीसा दचकलोच. फोन होता आमचे नागपूरचे रिपोर्टर रजत वशिष्ठ यांचा... फोन उचलतांना अगदी सहज लक्ष गेलं‌ ते वेळेच्या आकड्यांकडे. तर यावेळी वाजले होते पहाटेचे 3 वाजून 46 मिनिट. फोन उचलतांनाच काही तरी मोठं घडल्याच्या शंकेची पाल मनात चुकचुकली. फोन उचलतांनाच रजत धीरगंभीर आवाजात म्हणाले, "उमेश!, समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ एका खाजगी बसचा मोठा अपघात झालाय. 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. तुला लगेच तिकडे निघायचे आहे. मी क्षणाचाही विचार न करता लगेच 'हो' म्हणालो. मी अर्ध्या तासात तयार होऊन वाशीम जिल्ह्यातील मालेगावकडे निघालो. याचवेळी अमरावतीवरून कॅमेरामॅन अमोल देशमुख 'एबीपी माझा'चं 'लाईव्ह युनिट' घटनास्थळाकडे निघाले होते. वाटेत आम्ही मालेगावजवळ 'समृद्धी'वर एकत्र झालो. 

गाडी सुसाट घटनास्थळ असलेल्या पिंपळखुटा गावाकडे निघाली. वाटेत असतांना 'माझा'वरील बातम्या पहात होतो. त्यामुळे घटनास्थळावर पोहोचेपर्यंत अपघाताची भीषणता लक्षात आली होती. अशातच आम्ही सात-साडेसातच्या सुमारास घटनास्थळावर पोहोचलो. घटनास्थळावरचं सारंच चित्र पार हादरवून टाकणारं अन भेसूर होतं. मला तर घटनास्थळावरील चित्रं पाहून अगदी सुरूवातीलाच गलबलून आलं. क्षणभरासाठी माझ्यातला पत्रकार गळून पडला. मला अगदी हतबल झाल्यासारखं वाटलं. घटनास्थळावर पडलेला बसचा सांगाडा, त्यात अजुनही थोड्या-अधिक प्रमाणात धुमसत असलेसी आग, अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रवाशांच्या वस्तू, कपडे, अन येथे असलेल्या गर्दीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची हळहळ अन तळमळ हृदय पिळवटून टाकत होती. 

घटनास्थळावर अगदी पहाटेपासून आधीच आमचे नागपूरचे रिपोर्टर रजत वशिष्ठ आणि बुलढाण्याचे डॉ. संजय महाजन उपस्थित होते. त्यांनी अगदी सकाळी पहिल्या 'बुलेटि'नपासूनच या अपघाताची दाहकता अन भीषणता महाराष्ट्राला सर्वात आधी दाखविली होती. मी पोहोचल्यानंतर आमच्या 'टीम'नं प्रत्येक कामाची आखणी केली. जशीजशी वेळ जात होती तसेतसे आम्ही तिघेहीजण प्रत्येक मिनिटाला घटनास्थळावरून एक-एक नवं तथ्य आणि माहिती महाराष्ट्राला देत आणि दाखवत होतो. इकडे 1 जुलैची संपूर्ण महाराष्ट्राची सकाळ या भीषण आणि दु:खद बातमीनं झाल्यानं प्रत्येकजण टीव्हीसमोर बसला होता. प्रत्येक क्षण आणि गोष्टीचं रिपोर्टिंग करतांना माझ्या आतमधला माणूस, माझ्यातील पत्रकाराची परीक्षा आणि कसोटी पाहू लागला होता. सर्वात आधी सकाळी आठ वाजताच्या 'लाईव्ह'ला उभा राहिलो तेव्हा मी अक्षरश: माझे शब्द थिजल्याची भावना अनुभवली. मात्र, पत्रकारितेत भावनांसोबत तुमचा विवेक आणि जबाबदारीचं भान प्रत्येक क्षणाला जागृत असावं लागतं. पुढे याच जबाबदारीतून माझं रिपोर्टींग होत गेलं. 

घटनास्थळावर एका गोष्टीचं रिपोर्टिंग करताना मला आतून फार गलबलून आलं. बस जळालेल्या ठिकाणी अनेक वस्तू आणि साहित्य अर्धवट जळालेल्या स्थितीत विखुरलेलं होतं. त्यात कुणाचे कपडे होते, कुणाची शिदोरी होती, कुणाच्या बांगड्या होत्या, तर कुणाचं आणखी काही... माझं लक्ष गेलं त्या अस्ताव्यस्त सामानातील एका अर्धवट जळालेल्या डायरीवर. ती डायरी अपघातात मृत्यू झालेल्या कुण्यातरी महिलेची होती.... तिला रोज जे घडलं ते आपल्या 'डायरी'त लिहायची सवय होती. तिच्या 'डायरी'त तिनं अलिकडेच केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं की, 'वाट आणि वाटसरू चांगले मिळाली की 'प्रवास' सुखद होतो. असे प्रवास आयुष्यभर आठवणीत राहतात, शिकवून जातात'... नियतीनं कदाचित तिच्या याच भावनांवर सूड उगवायचं म्हणून तर हा अपघात घडवला नसेल ना?, असा प्रश्न सहजच मनाला स्पर्शून गेला. कारण तिच्या आजच्या प्रवासाचा मार्ग लौकिकार्थानं 'समृद्ध' होता. 'समृद्धी'वरून धावणारी ही बसही सर्व सुविधांनी 'समृद्ध' होती. मग 'समृद्ध' वाटसरूंच्या सोबतीनं सुरू असलेला हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी तिला 'आयुष्य'च राहू नये. नियती खरेच एव्हढी कठोर असू शकते का?, असा प्रश्न माझ्या मनाला वारंवार टोचत होता. अन् हिच टोचणी माझ्यातल्या पत्रकाराला वारंवार अस्वस्थ करीत होती... 

काल या घटनास्थळावर मी दिवसभरात जवळपास 9 तास होतो. रिपोर्टिंग करतांना ती बस, तिचा संपूर्ण तळलेला सांगाडा मला वारंवार दिसत होता. मी जेव्हा-जेव्हा या बसच्या जळलेल्या मृतदेहाकडे, सांगाड्याकडे पहात होतो, तेव्हा मला मनात ऐकू येत होता तो फक्त आणि फक्त आसमंत भेदून टाकणारा आक्रोश, किंकाळ्या अन मरणाची दाहकता. मी गेलो तेव्हा तेथून नेमके 25 जणांचे मृतदेह हलवले गेले होते. जेव्हा जळालेल्या बसमधून मृतदेह काढले गेलेत तेव्हा ते बसच्या अगदी मागच्या भागात जिथे खिडकी फोडण्यात आली होती तिथेच एकावर एक दिसून आलेत. कदाचित या फोडलेल्या खिडकीतून आपल्याला बाहेर येता येईल यासाठी प्रत्येकानं शेवटचा प्रयत्न केलेला असावा. 

मला सर्वात गलबलून मला तेव्हा आलं जेव्हा वृषाली बनकर अन् तिच्या चिमुकल्या दोन वर्षाच्या ओवीचा मृतदेह उचलला गेल्याचा क्षण. मेल्यानंतरही या मायलेकी एकमेकींना अक्षरश: बिलगून होत्या. बसला आग लागल्यानंतर आई वृषालीनं आपल्या लेकीला आगीच्या ज्वाळा लागू नयेत म्हणून अक्षरश: उराशी कवटाळत तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने जेव्हा अख्ख्या बसलाच कवेत घेतल्यावरही आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचविण्यासाठी वृषालीतल्या आईनं शेवटपर्यंत प्रयत्न केले असावेत. अगदी आपला 'कोळसा' होत असतानाही तिनं आपल्या काळजाच्या तुकड्याला कवेतून सोडलं नव्हतं. या अपघातातलं हे चित्र सर्वार्थानं भयावह आणि मन हेलावून टाकणारं होतं.

या बसमध्ये मरण आलेल्या प्रत्येकाची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी होती. बस जळत असताना एकमेकांना जळालेल्या अवस्थेत पाहून आकांत करणाऱ्या गंगावणे कुटुबांतील आई-वडील आणि मुलीची काय अवस्था झाली असेल? मुलाचा नागपूरला इंजिनिअरिंगला प्रवेश झालेलं हे कुटूंब नागपूरवरून गावी पुण्याकडे निघालं होतं. मुलगी सईचाही वैद्यकीय अभ्यासक्रम एमबीबीएसला प्रवेश निश्चित झाला होता. आयुष्याचं भविष्यातील 'समृद्धी'चं स्वप्न 'समृद्धी' महामार्गावर पार जळून खाक झालं होतं. या तिघाही बाप-लेकांना एकमेकांना जीवंत जळताना पाहून काय वेदना झाल्या असतील?, याची कल्पनाही करवत नाही.

पुण्याला 'इंटेरियर डिझायनिंग'च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला निघालेल्या अमरावती जिल्ह्यातील मंगरूळच्या राधिका महेश खडसेची कहाणीही मन विषण्ण करणारी. लोकांची घरं 'सुंदर' करण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या या बावीस वर्षाच्या पोरीची अन तिच्या स्वप्नांची या बस अपघातात पार राखरांगोळी झाली. असंच झालं वाशिमच्या मनिषा आणि संजय बहाळे या दांपत्याच्या बाबतीत. अगदी एकमेकांच्या डोळ्यासमोर हे पती-पत्नी जळत होते. या अपघातातलं प्रत्येक चित्रं हे पार भयावह आणि कल्पनाशक्तीच्या पलिकडचं होतं. या अपघातात मरण पावलेल्यांची संख्या 25 असली तरी या लोकांच्या जाण्याने शेकडो कुटूंब दु:खाच्या गर्तेत लोटल्या गेली आहेत. या अपघाताची भीषणता पुढची कित्येक वर्ष या कुटुबांशी संबंधित प्रत्येकाच्या हृदयात खोलवर 'जखम' करून गेलेली आहे. मी घटनास्थळावर जेव्हा-जेव्हा या बसच्या सांगाड्याजवळ गेलो तेव्हा मला प्रत्येक क्षणाला माझ्या मनाचा थरकाप उडाला. यातील लोकांच्या मरणाच्या शेवटच्या क्षणांच्या कल्पनेने मी प्रत्येकदा कासाविस झालो. ईश्वरानं इतका भयानक मृत्यू कधीच कुणाला देवू नये, असं प्रत्येक क्षणाला वारंवार वाटत आहे. 

काल दिवसभरात घटनास्थळावर अनेकांनी भेटी दिल्यात. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांसोबतच 'हवसे-गवसे अन नवशे'ही होते. 'रिपोर्टींग' करतांना आम्ही जवळपास प्रत्येक महत्वाचा नेता, अधिकारी आणि लोकांच्या मुलाखती दाखविल्यात. काहींच्या भावना अगदी मनातून आलेल्या तर काहींच्या भावना अगदी दिखावा वाटण्याइतपत कोरड्या वाटणाऱ्या. फक्त सोपस्कार पार पाडण्याच्या भावनेतून एखादं काम करण्याइतपत आम्ही निष्ठूर, भावनाशून्य आणि कोरडे झालो आहोत का?, असा प्रश्नही मनाला अनेकांच्या वागण्यातून पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र  फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन, संदिपान भूमरे, अतुल सावे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार श्वेता महाले, आमदार आकाश पुंडकर या नेत्यांसह सर्व अधिकारी घटनास्थळावर आलेत. सरकारी मदत जाहीर करण्याचे सारे 'सरकारी सोपस्कार'ही पार पडलेत?. नेत्यांच्या मुलाखती अन बाईटही दिवसभर चाललेत. परंतु?, एक प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीतच होता, तो म्हणजे समृद्धी महामार्गावरच्या अपघातांचं हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी?. अनेक कुटुंबाला सर्वार्थानं होरपळवणारी 'ये आग बुझेगी कब?'. 

कालच्या अपघातात सर्वच लोकांनी अगदी चांगलं काम केलं. अगदी महसूल आणि पोलीस प्रशासनातील लोकही सकाळपासूनच घटनास्थळावर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी झटत होते़. फक्त एका गोष्टीच्या अपवादानं पोलीस आणि महसूल प्रशासनातील काही संवेदनाशुन्य आणि कोडग्या प्रवृत्तींबद्दल वैषम्य वाटलं. अपघातात 33 पैकी 25 जणांचा मृत्यू झाला होता. तर यातील आठजण वाचले होते. यातील एखादा अपवाद वगळता सर्वांची प्रकृती अतिशय ठणठणीत होती. यातील काहीजण घटनेनंतर प्रचंड अस्वस्थ झाले होते. तर काही जण आपल्या घरी जाण्यासाठी तगमग करीत होते. मात्र, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री भेटायला रूग्णालयात येणार म्हणून यातील काहींना अक्षरश: सिंदखेडराजाच्या ग्रामीण रुग्णालयात 'व्हीआयपीं'चे दौरे होईपर्यंत अक्षरश: डांबण्यात आल्याचं त्यातील काहींनी सांगितलं.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या रूग्णालयाच्या भेटीचे 'सोपस्कार' पार पडल्यानंतर जखमीतील सर्वांना सुट्टी देण्यात आली. यात यवतमाळच्या आयुष गाडगेचा समावेश होता. त्याच्यासोबत त्याचे आणखी तीन मित्र होते. सुट्टीनंतर या सर्वांना प्रशासनाने अक्षरश: वाऱ्यावर सोडले. ना त्यांना जेवण विचारलं, ना चहा... या चौघांकडे गावाकडे यवतमाळला जायलाही पैसे नव्हते. प्रशासनाकडून काही प्रतिसाद मिळण्याची आशा नसल्यानं आम्ही पत्रकारांनी ही बाब शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या कानावर घातली. अगदी काही मिनिटांत तुपकरांनी या चौघांसाठी आपलं वाहन पाठवत त्यांना दवाखान्यातून सोबत घेतलं. त्यांना जेऊ-खाऊ घातलं अन त्यांना एका विशेष वाहनाने त्यांच्या गावी यवतमाळ आणि वणीला पोहोचवून दिलं. एकीकडे प्रशासनातील काहींची असंवेदनशीलता दिसत असतांनाच रविकांत तुपकरांमधील नेत्यापलिकडच्या संवेदनशील माणसाचाही नव्याने परिचय झाला. 

'समृद्धी महामार्गा'चा पार मोठा गाजावाजा केला गेला. त्याच्या उद्घाटनाचा मोठा 'इव्हेंट'ही केला गेला. या समृद्धीनं महाराष्ट्रातील काही नेते आणि अधिकाऱ्यांच्या आयुष्यात दहा पिढ्यांची समृद्धी आली, अशी चर्चाही आहे. मात्र मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांवर फक्त 'बोलाचीच कढी' ऊतू जात असल्याचे चित्र आहे. अपघात थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर 'समृद्धी'नं अनेकांच्या जीवासोबतच परिवारांच्या भविष्याची 'अधोगती' होण्याची शक्यता आहे. कालच्या अपघातानं तरी सरकारचे डोळे उघडावेत अन हे दुष्टचक्र थांबावं, अशी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा असेल. 

या संपूर्ण घटनेचं सारं रिपोर्टिंग 'एबीपी माझा'नं सर्वात जलद, संवेदनशीलता आणि जबाबदारीनं केलं. आमच्या 'टीम वर्क'नं या अपघातामागचे प्रकाशझोतात न आलेले अनेक पैलू संपूर्ण महाराष्ट्रासमोर उजेडात आणलेत. काल संध्याकाळी पाचच्या सुमारास आमची संपूर्ण 'टीम' सर्व काम संपवत घटनास्थळावरून आपापल्याकडे गावाकडे निघाली. निघतांना बसच्या सांगाडा हळूहळू मागे पडत नजरेसमोरून धुसर झाला. मात्र, अपघातातील जीवाच्या आकांताने ओरडणारे 25 जीव, त्यांच्या आर्त किंकाळ्या, त्यांची तगमग कशी धूसर होणार?. आयुष्यात अशा प्रसंगाचं रिपोर्टींग करण्याची वेळ कधीच येऊ नये ही प्रार्थना मनोमन ईश्वराला केली. 'समृद्धी'वर परतीच्या प्रवासात आमच्या गाडीचा वेग वाढतांना 'तो' गाडीचा सांगाडा हळूहळू नजरेपासून धूसर होत गेला. मात्र, हा अपघात, तेथील पाहिलेली भीषणता, हतबलता, वेगाच्या आसुरी हव्यासातून उजाडलेल्या 25 जीवांचं अन शेकडो परिवारांचं भेसूर स्वप्नं माझ्या 'पत्रकारिते'च्या डायरीत नकोशा लाल अक्षरांनी कायमचं 'गडद' होऊन गेलं ते कायमचंच... सर्व मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली!. ओम शांती!!!....

 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget