Agriculture News : कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान
कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Agriculture News : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. 1 जुलै म्हणजे कृषी दिनापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे.
दरम्यान, 2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे. मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या तसेच त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येणार आहे.
दरम्यान, या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. दरम्यान, या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: