Latur News : लग्न मोडल्यानंतर झालेल्या खर्चासाठी तगादा, मुलाने व्हिडीओ व्हायरल करत जीवन संपवलं
Latur Suicide News : लातुरातील एका 27 वर्षाच्या युवकाने व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
लातूर: लग्न जमल्यानंतर ते मोडलं, पण मुलीच्या घरच्यांनी टीळाच्या कार्यक्रमासाठी खर्च झालेल्या पैशाचा तगादा लावल्याने एका युवकाने आत्महत्या (Latur Suicide News) केल्याची धक्कादायक घटना लातुरात घडली. आई-वडिलांचा झालेला अपमान आणि आर्थिक तगादा यामुळे मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक व्हिडीओ व्हायरल केला. या प्रकरणी पोलिसात गु्न्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील जढाळा या गावात श्रीहरी विठ्ठल पाटोळे या 27 वर्षीय तरुणाने 20 सप्टेंबर रोजी व्हिडीओ व्हायरल करत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीहरी विठ्ठल पाटोळे या तरुणाचे कुटुंबीय काही दिवसापूर्वी सुमनवाडी येथील श्रीमंत देवळकर यांच्या घरी स्थळ पाहण्यासाठी गेले होते. देवळकरांची मुलगी पाटोळे कुटुंबीयांना पसंत पडली. देणे-घेण्याची बोलणी झाली. काही दिवसांपूर्वी लग्न पक्कं करण्यात आलं. टीळाचा कार्यक्रमही पार पडला. देवळकर कुटुंब यांनी शक्यतो सन्मानपूर्वक टीळाचा कार्यक्रम संपन्न केला.
दुसऱ्या दिवशी श्रीहरी पाटोळे यांनी घरच्यांना सांगितलं की मला लग्न करायचं नाही. पाटोळे कुटुंबियांनी हा निरोप देवळकर कुटुंबीयांना दिला. कालपर्यंत मुलगी पसंत होती.. तिळाचा कार्यक्रम ही संपन्न झाला आणि आज लग्नास नकार यामुळे देवळकर कुटुंबीय नाराज झाले होते. लग्नास नकार का दिला? काय कारण आहे ते सांगा. सगळ्या नातेवाईकंना निरोप गेले आहेत. आता लग्नास नकार देत आहेत, काय सांगावं लोकांना? झालेला खर्च ही वाया गेला असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
देवळकर कुटुंबीय यांनी पाठोळे कुटुंबीयांना जाब विचारायला सुरुवात केली. झालेला खर्च द्या म्हणून तगादा लावला होता. शेवटी बैठक बसली आणि खर्च देण्याचा ठरलं. यात श्रीहरीच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागल होता.
माझ्यामुळे झालं, मला माफ करा
हा सर्व घटनाक्रम आपल्यामुळे घडल्याचं शल्य श्रीहरीच्या मनात होते. यामुळे त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात श्रीहरीने आई-वडिलांना एक संदेश दिला. 'आई पप्पा मला माफ करा. मला मुलगी पसंत नाही म्हणालो. यामुळे ते पैसे मागत आहेत. म्हणून मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेत आहे ...मला माफ करा.'
हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यावेळेस ही घटना श्रीहरीच्या कुटुंबियांना कळाली त्यावेळेस त्यांना मोठा धक्का बसला.
गुन्हा दाखल, दोन जण अटकेत
श्रीहरीचे वडील विठ्ठल पाटोळे यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे मामा आणि मुलीचे वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून. त्या दोघांना किनगाव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती किनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी दिली आहे.
ही बातमी वाचा: