IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
Team India Updates For England Series : बीसीसीआयच्या बैठकीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचे काय चुकले ते समजून घेणे हा या बैठकीचा उद्देश होता. ही बैठक सुमारे दोन तास चालली.
Team India Updates For England Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी मुंबईत आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर इंग्लंडविरुद्ध बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा करताना चांगलीच गुगली टाकली आहे. बीसीसीआयच्या बैठकीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचे काय चुकले ते समजून घेणे हा या बैठकीचा उद्देश होता. कॅप्टन रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव देवजीत सैकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला आढावा बैठकीला उपस्थित होते. ही बैठक सुमारे दोन तास चालली.
कोहली-रोहितच्या भवितव्यावर चर्चा
या बैठकीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत रोहितच्या कॅप्टनसीवर कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी कॅप्टन ठरवण्यासाठी बुमराहच्या नावावर सुद्धा चर्चा करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कोहलीची कामगिरी पाहून त्याच्याशी पुन्हा चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर चर्चा झाली. दोन्ही खेळाडूंना मैदानावर चांगली कामगिरी करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. याशिवाय रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही बैठकीत चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार सध्या काहीही होणार नाही, परंतु व्यवस्थापन चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधारपदाबाबत निर्णय घेऊ शकते. परिस्थिती बदलली नाही तर कर्णधारपदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
देशांतर्गत सामन्यांमध्ये सहभागी व्हावे लागेल, अन्यथा निवड नाही
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीवर विराट आणि रोहितचे सर्व काही अवलंबून आहे. द्विपक्षीय मालिका आणि देशांतर्गत स्पर्धांपासून खेळाडू दूर राहत असल्याने संघ व्यवस्थापन खूश नाही. अशा खेळाडूंची निवड केली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. खेळाडूंना देशांतर्गत सामन्यांमध्ये सहभागी व्हावे लागेल. याबाबत खेळाडू आणि निवडकर्त्यांनाही कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
फलंदाजांच्या कामगिरीवर गंभीर चर्चा
'बैठकीत संघाच्या कामगिरीवर, विशेषत: फलंदाजीबाबत सविस्तर चर्चा झाली. मजबूत फळी असूनही भारतीय फलंदाज चांगली कामगिरी का करत नाहीत हे व्यवस्थापनाला समजून घ्यायचे होते. याशिवाय मुख्य कारण आणि त्यात सुधारणा यावरही चर्चा झाली. सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला असून चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेचच काही पावले उचलली जातील.
ऋषभ पंतच्या पदरी निराशा, अक्षर पटेल उपकर्णधार
दुसरीकडे, T20 मालिकेसाठी संघ निवडीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अक्षर पटेल उपकर्णधार. अक्षरची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्याचा निर्णय धक्कादायक होता. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान भारतीय संघात उपकर्णधार नव्हता. याआधी श्रीलंका मालिकेदरम्यान शुभमन गिलकडे जबाबदारी होती. हार्दिक पांड्या देखील संघाचा एक भाग आहे, परंतु त्याच्याऐवजी अक्षर पटेलला महत्त्व देणे हे एक संकेत आहे की निवडकर्त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेसाठी इतर पर्यायांची चाचणी घ्यायची आहे.
ऋषभ पंत संघाचा भाग नाही
यष्टिरक्षक ध्रुव जुरेलचा टी-20 संघात एन्ट्री झाली आहे. मात्र, ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला नाही. पंतने शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता. ज्युरेलचा बॅकअप यष्टिरक्षक म्हणून 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर संजू सॅमसनची प्रथम पसंती यष्टीरक्षक म्हणून संघात निवड करण्यात आली आहे. जुरेलने झिम्बाब्वे दौऱ्यात भारतासाठी 2 टी-20 सामने खेळले होते. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांनीही टी-20 संघात स्थान मिळवले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हे तिघेही भारतीय संघाचा भाग होते. शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हे खेळाडू इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात असण्याची शक्यता आहे.
मोहम्मद शमीचे 14 महिन्यांनंतर पुनरागमन
अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन ही निवडीची मोठी बाब आहे. शमी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर दूर होता. 34 वर्षीय मोहम्मद शमीचे तब्बल 14 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर शमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डाव्या गुडघ्याला सूज आल्याने शमीला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावे लागले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 5 खेळाडू बाहेर
अष्टपैलू रमणदीप सिंग, यष्टीरक्षक जितेश शर्मा, विजयकुमार वैशाक, यश दयाल आणि आवेश खान हे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टी-20 मालिकेत भारतीय संघाचा भाग होते. मात्र, या पाच खेळाडूंना यावेळी संघात स्थान मिळालेले नाही.
संघात चार फिरकी गोलंदाजांचा समावेश
भारतीय खेळपट्ट्या फिरकीसाठी अनुकूल मानल्या जातात. हे पाहता टी-20 मालिकेसाठी चार फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे अक्षर आणि सुंदर हे देखील उत्कृष्ट फलंदाज आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे टीम इंडियाची फलंदाजीही मजबूत दिसत आहे. भारत दौऱ्यावर इंग्लंड संघ प्रथम 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. पहिला सामना 22 जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे. टी-20 नंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीही एकदिवसीय स्वरूपात असेल. अशा स्थितीत ही मालिका दोन्ही संघांसाठी सरावाची ठरणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या