Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Kirit Somaiya : अंजनगाव सुर्जीत 1100 बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसीलदारांनी बनावट कागदपत्रांवरून जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अमरावती : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1100 हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दरम्यान, या आरोपानंतर या प्रकरणातील तथ्य तपासण्यासाठी किरीट सोमय्या हे आज अंजनगाव सुर्जी आणि अमरावती तहसील कार्यालयाला भेट देणार आहेत. याआधी सोमय्या यांनी असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगावात झाल्याचा आरोप केला होता. यानंतर सोमय्या यांनी मालेगावला भेट दिली होती. सोमय्या यांच्या अंजनगाव सुर्जी आणि अमरावतीच्या दौऱ्यानंतर या प्रकरणी वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
भाजपचे माजी खासदार आणि किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीत मालेगाव व अंजनगाव सुर्जीचा उल्लेख करून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदारांनी गेल्या सहा महिन्यांत 1100 बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिली आहेत अशी तक्रार केली होती. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
सोमय्यांच्या तक्रारीनंतर अमरावतीत चौकशी समिती
माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने 9 जानेवारीला या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी या समितीचे प्रमुख असतील, ज्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी आणि मुख्य अधिकारी सदस्य म्हणून असतील. समितीला प्रकरणाची सखोल चौकशी करून त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांनी फेटाळले सोमय्यांचे आरोप
दरम्यान, अंजनगाव सुर्जी तहसीलदार पुष्पा सोलंके यांनी हे आरोप फेटाळले असून, त्यांच्या कार्यालयाने मागील एका वर्षात एकूण 569 जन्म प्रमाणपत्रे जारी केली असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये 485 मुस्लिम आणि 84 हिंदू अर्जदारांच्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तसेच, सुमारे 1000 अर्ज अजूनही तपासणीसाठी प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
असा असेल किरीट सोमय्या यांचा दौरा
माजी खासदार किरीट सोमय्या सकाळी 10 वाजता ते अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाला भेट देतील. या ठिकाणी ते तहसीलदारांची भेट घेत या प्रकरणातील तथ्य जाणून घेतील. यानंतर दुपारी 2 वाजता ते अमरावतीमधील राधेश्याम अग्रवाल यांच्या घरी जेवण आणि आराम करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता ते अमरावती तहसील कार्यालयाला भेट देतील. या ठिकाणी ते या प्रकरणाच्या संदर्भात चौकशी करतील. यानंतर दुपारी 4 वाजता ते अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी पावणेपाच वाजता ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. यानंतर अमरावती भाजपाचे महामंत्री सतीश करेसिया यांच्या घरी सदिच्छा भेट देतील. संध्याकाळी सात वाजता ते अंबा एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान करतील. या संपूर्ण दौऱ्यात त्यांना 'सीआयएसएफ'ची 'झेड' सुरक्षा असेल.