'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Kunal Kamra Video Case : कामरा यांनी दोन दिवसांत माफी मागितली नाही, तर तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याचे तोंड काळे करतील." असा इशाराही शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्याकडून देण्यात आला आहे.

मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या (Kunal Kamra Video) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर टीका केलेल्या एक व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला होता. याच प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधत गुन्हा दाखल केला आहे. आमदार मुरजी पटेल यांच्याकडून पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे की, कुणाल कामराला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. त्याचसोबत कुणाल कामराला दोन दिवसाचा आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माफी मागावी, अन्यथा कुणाल कामराला मुंबईमध्ये फिरू देणार नसल्याच्या इशारा मुरजी पटेल (Murji Patel) यांनी दिला आहे.
"आम्ही कामराविरोधात एफआयआर दाखल केला आहे आणि डीसीपीकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. कामरा यांनी दोन दिवसांत माफी मागितली नाही, तर तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याचे तोंड काळे करतील." असा इशाराही शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्याकडून देण्यात आला आहे.
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू- मुरजी पटेल
दरम्यान, अधिवेशनात आज शिवसेना शिंदे गटाचे सर्व आमदार कुणाल कामरा विरोधात आंदोलन करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणार आहे. यावेळी कुणालवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देणार असल्याची माहिती ही आमदार मुरजी पटेल यांनी दिली आहे. कुणाल कामरा याने त्यांच्या विनोदी कार्यक्रमात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर अश्लील गाणी गायली होती. त्यावरून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला आणि त्यांनी कामरा यांच्या खार येथील कार्यालयाची तोडफोड केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. काही लोक याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला म्हणत आहेत, तर काहींचे म्हणणे आहे की कॉमेडीलाही मर्यादा असावी. आता या प्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करतात आणि कुणाल कामरा या वादावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बदनामीकारक गाणं असेल तर ते अजिबात सहन करणार नाही- उदय सामंत
दरम्यान, याच मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आक्रमक पवित्रा घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक गाणं असेल तर ते सहन करणार नाही, असा इशारा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. या आधीही कुणाल कामरा हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीला ट्रोल केल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तसेच कुणाल कामराने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर त्याच्या कार्यक्रमातून टीका केली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

