Kolhapur : कोल्हापुरात उद्यापासून भीमा कृषी प्रदर्शन;12 कोटींचा बादशाह रेडा अन् 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस खास आकर्षण
भव्य भीमा कृषी प्रदर्शन उद्यापासून कोल्हापुरात सुरु होत आहे. येथील मेरी वेदर मैदानावर प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या गुरुवारी दुपारी 12 वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

Bhima Agricultural Exhibition in Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य भीमा कृषी प्रदर्शन उद्यापासून कोल्हापुरात सुरु होत आहे. येथील मेरी वेदर मैदानावर प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या गुरुवारी दुपारी 12 वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असेल. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार महादेवराव महाडिक यांची असणार आहे. सोहळ्यास माजी आमदार अमल महाडिक, प्रभास फिल्मचे संग्राम नाईक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, सुहास देशपांडे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनामध्ये पाच महिलांना जिजामाता शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धांचे बक्षीसे दिली जाणार आहेत.
12 कोटींचा बादशाह रेडा आणि 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस
प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा हरियाणातील 12 कोटींचा बादशाह रेडा आणि 31 लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनात खास आकर्षण असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केलेल्या मिलेटचे (तृणधान्य) याचे स्वतंत्र दालन असणार आहे. प्रथम मिलेटिइयरमध्ये ४० स्टॉल असणार आहेत. शिवाय जीआय मानांकन असणारे पदार्थ पहायला मिळणार आहेत.
नितीन गडकरी भेट देणार
प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देण्यात येणार आहे. 28 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रदर्शनास भेट देणार आहेत. या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
400 पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश
प्रदर्शनामध्ये 400 पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे. त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली 200 बचत गटांना मोफत देण्यात आले आहेत. ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे. चार दिवस याठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
