Sunandan Lele Pakistan : सुनंदन लेलेंना पाकिस्तानात पोलिसांनी रोखलं, पुढे काय घडलं?
Sunandan Lele Pakistan : सुनंदन लेलेंना पाकिस्तानात पोलिसांनी रोखलं, पुढे काय घडलं?
इस्लामाबाद : चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy) थरार क्रिकेटविश्वात सुरु आहे. यानिमित्त एबीपी माझावर विशेष कव्हरेज सुरु आहे. एबीपी माझाकडून ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले (Sunandan Lele) हे थेट दुबई आणि पाकिस्तानातून वार्तांकन करत आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार थेट ग्राऊंडवरुन अनुभवायला मिळत आहे.
क्रीडा समीक्षक सुनंदन लेले हे सध्या पाकिस्तानात पोहोचले आहेत. ते क्रिकेटशिवाय पाकिस्तानातील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती मराठी प्रेक्षकांना दाखवत आहेत.
नुकतंच त्यांनी पाकिस्तानातील शिवमंदिराला भेट देऊन, त्याचा आढावा घेतला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी राज कटासला पूजा केली. "पाकिस्तानमध्ये इस्लामाबादहून लाहोरला येण्याच्या रस्त्यात वाकडी वाट करून राज कटास शिवगंगा मंदिर परिसरात गेलो. आणि महाशिवरात्रीचे औचित्य साधून पूजा केली", असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राजकटास शिवगंगा मंदिर परिसराला भेट देऊन परत निघालो असताना अचानक पोलिसांनी गाडी अडवली. सुरुवातीला कठोर चेहर्याने तपासणी करणारे पालीस मी भारतीय पत्रकार आहे समजल्यावर एकदम नरमले. मला लाहोरला जायची घाई आहे सांगूनही त्यांनी गाडीतून खाली उतरवले आणि मग रंगल्या थोड्या गप्पा. स्थानिक पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची संघाने केलेली निराशा त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली. तसेच भारत पाकिस्तान संबंध चांगले व्हावेत अशी इच्छाही त्यांनी प्रदर्शित केली.























