जी 23 गटाशी वर्तणुकीत काँग्रेस हायकमांडकडून अनपेक्षित बदल, हायकमांड पराभवानंतर नरमलं आहे का?
Congress on G 23 Latest Update : पाच राज्यातल्या पराभवानंतर काँग्रेसमधल्या जी 23 गटाचा आवाज वाढत चाललाय आणि काँग्रेस हायकमांडकडून त्याला हाताळण्याची पद्धतही बदललीय.
Congress News Updates : पाच राज्यातल्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचं भवितव्यच सध्या टांगणीला लागलं आहे. एकीकडे जी 23 गटाचा सूर आक्रमक होतोय. तर दुसरीकडे विरोधी सूर, वेगळ्या बैठका करुनही या गटाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी काँग्रेस हायकमांडनं पहिल्यांदाच वेळही दिला आहे. त्यामुळे पराभवानंतर काँग्रेस हायकमांड काहीसं नरमलं आहे का अशीही चर्चा सुरु झाली आहे.
पाच राज्यातल्या पराभवानंतर काँग्रेसमधल्या जी 23 गटाचा आवाज वाढत चाललाय, आणि काँग्रेस हायकमांडकडून त्याला हाताळण्याची पद्धतही बदललीय. काल तर या जी 23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी चर्चेसाठी बोलावलं. त्याआधी याच बैठकीत उपस्थित असलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री दीपेंदर सिंह हुड्डा यांनीही राहुल गांधींची भेट घेतली होती.
काँग्रेस हायकमांड पाच राज्यातल्या पराभवानंतर काहीसं मवाळ झालंय का
मुळात या वेळेला जी 23 गटाचं म्हणणं असं ऐकून घेतलं जातंय हेच विशेष. त्यामुळे काँग्रेस हायकमांड पाच राज्यातल्या पराभवानंतर काहीसं मवाळ झालंय का असाही प्रश्न उपस्थित होतो. याआधी ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेसच्या जी 23 गटानं पहिल्यांदा हायकमांडला पत्र लिहून आपली नाराजी कळवली होती. त्यावेळी काँग्रेस वर्किग कमिटीत अनेक नेत्यांनी त्यांच्या भूमिकेचा विरोध केला होता..शिवाय नेत्यांनी जाहीर विधानं करु नयेत, जे काही प्रश्न असतील त्याबद्दल माझ्याशी बोलावं असंही सोनिया गांधींनी म्हटलं होतं. आता मात्र या गटाला प्रतिसाद देण्याची पद्धत पूर्णपणे बदलल्याची दिसतंय.
पाच राज्याच्या निकालानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली..पाच तास चिंतन झालं. त्यानंतरही जी 23 गटाच्या दोन वेगवेगळ्या बैठका झाल्या. या नेत्यांनी एक ठराव करत आपल्या मागण्याचं निवेदनही जाहीर केलं. ज्यात सर्वसमावेशक नेतृत्व असावं याबाबत चिंता व्यक्त केलीय.
काँग्रेसच्या जी 23 गटाला नेमकं हवंय काय
काँग्रेसच्या जी 23 गटाचा आक्षेप आहे की राहुल गांधी हे कुठल्याही जबाबदारीविना अधिकार बाळगून आहेत.
राहुल, प्रियंका यांच्या जवळचं जे कोंडाळं आहे त्यांच्या आधारावरच सणकी पद्दतीनं निर्णय घेत पक्ष चालवला जातोय.
काँग्रेसच्या संसदीय बोर्डाची रचना व्हावी. काँग्रेस वर्किंग कमिटीतल्याच 8 ते 10 लोकांमधून निवडणूक पद्धतीनं हे बोर्ड निवडलं जावं.
राज्यसभेची तिकीटं, वेगवेगळ्या निवडणूका याबाबत निर्णय एकानं न घेता या बोर्डाच्या माध्यमातून व्हावेत
आता यातल्या कुठल्या मागण्या होतायत, पक्ष त्यावर गांभीर्यानं विचार करतंय हे पाहायला हवं. कारण 2019 ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर 2024 ची पुढची निवडणूक आली तरी अजून पूर्णवेळ अध्यक्ष पक्षाला लाभलेला नाहीय.
राहुल गांधींनी एकतर जबाबदारी घ्यावी किंवा मग काही काळ बाजूला तरी राहावं अशी या जी 23 गटाच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे लोकसभेतलं सभागृहनेते त्यांच्याकडे आणि गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष अशाही एका पर्यायावर चर्चा सुरु असल्याचं कळतंय. पण मग नवा अध्यक्ष हा देखील गांधीनिष्ठ असणार की जी 23 गटापैकी कुणी यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे.
संबंधित बातम्या
राहुल गांधींकडेच पुन्हा नेतृत्व सोपवा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी