Congress : पराभव जिव्हारी..., राजीनामा द्या! पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधींचा आदेश
Sonia Gandhi : पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर संघटनात्मक बदलांना वाट मोकळी करून देण्यासाठी संबंधित पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा मागण्यात आला आहे.
नवी दिल्ली: पाच राज्यांत काँग्रेसचा झालेला पराभव हा पक्षाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. पंजाबसारखं राज्यही 'आप'ने काँग्रेसच्या हातून काढून घेतलं असून गोव्यातही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. यामध्ये पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचाही समावेश आहे.
पंजाबमध्ये नवज्योतसिंह सिद्धू प्रदेशाध्यक्ष असून उत्तर प्रदेशमध्ये अजय कुमार लल्लू यांच्याकडे ही जबाबदारी आहे. तसचे उत्तराखंडमध्ये गणेश गोदियाल, गोव्यात गिरीश चोडनकर आणि मणिपूरमध्ये नमेईरकपॅम लोकेन सिंह हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पेलत आहेत. या पाचही राज्यामध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलंय.
पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही आपसारख्या तुलनेने नव्या पक्षाने काँग्रेसला चारीमुंड्या चित केलं आहे. हे काँग्रेस हायकमांडला चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसून येतंय. तसेच गोव्यातही पक्ष सत्तेत येईल अशी स्थिती असताना निकालानंतर गोव्यात सुमार कामगिरी झाल्याचं दिसून आलंय. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा चांगलाच धुव्वा उडाला असून उत्तराखंड आणि मणिपूर या ठिकाणची परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे या पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडून आता राजीनामा मागितला आहे.
Congress President, Smt. Sonia Gandhi has asked the PCC Presidents of Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa & Manipur to put in their resignations in order to facilitate reorganisation of PCC’s.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 15, 2022
दरम्यान, पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर पक्षाने या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पक्षाच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठकही बोलावण्यात आली. त्यामध्ये जी-23 नेत्यांचा समावेश होता. त्यावेळी सोनिया गांधी यांनी पक्षाच्या भल्यासाठी आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचा पवित्रा घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पण इतर सर्व नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याचं मान्य केलं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha