G23 Congress : काँग्रेसमधल्या G23 गटातील नेत्यांच्या आवाजाची दखल पक्ष घेणार का?
काँग्रेसमधल्या G23 गटाच्या नेत्यांच्या बैठकीत अप्रत्यक्षपणे प्रियंका गांधींच्या महासचिवपदाच्या राजीनाम्याचीही मागणी केल्याचं दिसतं. पण ही मागणी मान्य होणार का?
![G23 Congress : काँग्रेसमधल्या G23 गटातील नेत्यांच्या आवाजाची दखल पक्ष घेणार का? G23 Congress Who exactly are the leaders of the G-23 group in the Congress, will the party take note of their voices? G23 Congress : काँग्रेसमधल्या G23 गटातील नेत्यांच्या आवाजाची दखल पक्ष घेणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/98dce18ee408d68d8a37d4878ea2d8af_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पराभवानंतर पाच राज्यातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे, मग या राज्यांत प्रभारी असलेल्या महासचिवांचे का नाहीत? हा प्रश्न आहे काँग्रेसमधल्या G23 गटाचा. दिसायला हा प्रश्न साधारण वाटत असला तरी त्याचा रोख थेट आहे प्रियंका गांधींवर. कारण उत्तर प्रदेशात गेल्या तीन वर्षांपासून प्रियंका महासचिव म्हणून काम करत आहेत.
निकालानंतर पाच प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश सोनिया गांधींनी दिला. पण या राज्यांमध्ये प्रभारी असलेल्या महासचिवांवर मात्र अजून कुठलीही कारवाई नाही. त्याचमुळे प्रियंका यांना वाचवण्यासाठी ही धडपड सुरु आहे का असाही सवाल उपस्थित होतोय. उत्तर प्रदेशात काँग्रेसला एकूण 403 पैकी अवघ्या 2 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस ही केवळ सणकी लोक चालवत आहेत, ठराविक लोकांच्या कोंडाळ्यातून निर्णय होत आहेत. सर्वसमावेशकता नाही, असाही आरोप G23 गटाकडून होत आहे. कालच्या (16 मार्च) बैठकीनंतर त्यांनी काढलेल्या पत्रातलं एक वाक्य तर अजून महत्त्वाचं आहे. 2024 ला समर्थ पर्याय निर्माण करण्यासाठी समविचारी पक्षांशी बोलणी सुरु करावीत, असं त्यांनी म्हटलं हे. म्हणजे हा समर्थ पर्याय पक्षात त्यांना दिसत नाही हाही त्याचा अर्थ.
काँग्रेसमध्ये इतका थेट विरोध करणारे हे नेते नेमके कोण आहेत यावरही नजर टाकूया...
काँग्रेसमधला G23 गट नेमका आहे तरी काय?
- गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या काल बैठकीला एकूण 18 नेते हजर होते.
- यात आनंद शर्मा, मनिष तिवारी, कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्वात लक्षवेधी उपस्थिती होती शशी थरुर आणि मणिशंकर अय्यर यांची
- या गटात राज्यसभा सदस्यता गमावलेले गुलाम नबी आझाद, तर लवकरच ज्यांची टर्म संपतेय अशा आनंद शर्मा यांचा समावेश आहे
- पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद, भूपिंदरसिंह हुड्डा, शंकरसिंह वाघेला या चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे
- वाघेला यांनी तर काँग्रेस सोडलेली आहे, पण तरीही कालच्या निवेदनावर त्यांची सही होती
साहजिकच काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा रोख या G23 गटातल्या नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवरही आहे. मुळात सत्ता असताना त्याचे सर्व फायदे या नेत्यांनी घेतलेले आहेत आणि आता लढायची वेळ असताना यातले किती नेते मैदानात उतरतात असाही सवाल उपस्थित केला जातो.
त्यामुळे आता G23 गटाकडून उपस्थित केले जाणारे हे प्रश्न पक्षाच्या अजेंड्यावर घेतले जाणार का, की या नेत्यांनाच बेदखल करुन काँग्रेसमधल्या दुहीचा पुढचा अंक पाहायला मिळणार, हे लवकरच कळेल.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)