(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल गांधींकडेच पुन्हा नेतृत्व सोपवा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी
Congress Committee Meeting : राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेसची सुत्रे द्यावीत, अशी मागणी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीण करण्यात आली आहे.
Congress Committee Meeting : राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेसची सुत्रे द्यावीत, अशी मागणी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीण करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीवर विचारमंथन करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुकुल वासनिक, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, भुपेश बगेल यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षत्येखाली रविवारी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेसचं नेतृत्वा पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
रविवारी पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्याकडेच पुन्हा नेतृत्व सोपवावे, अशी मागणी केली. अशोक गेहलोत यांनी एएनआयला सांगितले की, ‘राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यास काँग्रेस एकसंथ राहील. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली याआधी सर्व काँग्रेस नेते एकत्र आले होते. गांधी कुटुंबाबद्दल बोलतात, पण गेल्या तीस वर्षात गांधी कुटुंबातील एकाही व्यक्तीने मुख्यमंत्री, पंतप्रधान अथवा कोणतेही मंत्रिपद स्वीकारले नाही. असे असतानाही पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे का दिले जात नाही? गांधी कुटुंबावर सर्वच जाती-धर्मातील लोकांची श्रद्धा आहे. आणि काँग्रेस मजबूत करण्यासाठी गांधी कुटुंब आवश्यक आहे’
कर्नाटकमधील काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनीही ट्विट करत काँग्रेसचं नेतृत्वा पुर्णपणे राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी केली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही श्रीनिवास यांनीही राहुल गांधींकडे अध्यक्षपद द्यावे अशीच मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘गांधी कुटुंब केवळ काँग्रेसच नव्हे तर देशातील सर्व घटकांना एकत्र बांधणारा धागा आहे. तो कोणत्याही निवडणुकीतील विजय किंवा पराभवावर अवलंबून नाही.’ जिंकणे किंवा हरणे, हा राजकारणातील एक भाग आहे. पण हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. हे राजकाराणासाठी धोकादायक आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या झारखंड युनिटने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवण्यात यावे, असा ठराव मंजूर केला.
उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. पंजाबसारखं मोठं राज्यही काँग्रेसच्या हातून गेलं आहे, तर गोव्यामध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. पण त्या राज्यामध्ये पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या, त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेली या ठिकाणीही काँग्रेसला पक्षाचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत.