Amarnath Yatra registration ban : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 28 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन स्थगित
कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे.
नवी दिल्ली : भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेची नोंदणी स्थगित करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी 28 जूनला सुरु होणारी ही यात्रा रक्षाबंधन, म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंतच्या काळात पार पडणार आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे.
In view of evolving COVID19 situation, registration for Amarnath Yatra is being temporarily suspended. The situation is being constantly monitored and it would be reopened once the situation improves: Shri Amarnathji Shrine Board
— ANI (@ANI) April 22, 2021
भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3,14,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 178,841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसांत सर्वाधिक तीन लाख सात हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
अमरनाथ यात्रेचं महत्त्व
हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं. आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं. त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
अमरनाथ गुहेची अख्यायिका
भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य 'राजतरंगिणी'तमध्येही आहे. या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात.