Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चंद्रपूर : देशभरात आज (26 फेब्रुवारी) साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री (MahaShivratri 2025) निमित्य सर्व शिवमंदिर आणि तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. तर राज्यभरात अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असताना चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील व्याहाड येथील ही घटना असून आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
काळाचा घाला, 3 सख्या बहिणींचा बुडून वैनगंगा नदीत मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील या तिघी सख्ख्या बहिणी आपल्या काका, काकू आणि त्यांच्या 4 वर्षीय मुलासह गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जात होते, मात्र हरणघाट मार्ग खराब असल्याने मार्कंडासाठी गडचिरोलीमार्गे जात असताना व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्याचा त्यांनी बेत आखला. अशातच चंद्रपूर-गडचिरोली सिमेवरील एका झाडाखाली गाडी ठेवून सर्व जण नदी पात्रात उतरले. मात्र आंघोळ करीत असतानाच एक लहान बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे दिसताच इतर सर्वांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात काका-काकू आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला. तर 3 बहिणींचा मात्र या पाण्याचा प्रवाहात वाहत जाऊन खोल पाण्यात मृत्यू झालाय. प्रतिमा प्रकाश मंडल (वय 23 वर्ष), कविता प्रकाश मंडल (वय 21 वर्ष) आणि लिपिका प्रकाश मंडल (वय 18 वर्ष) अशी मृतकांची नावं असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास सावली पोलीस आणि आपदा प्रबंधन विभाग करत असून मृतदेहांचा शोध सध्या घेतला जात आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा मृत्यू
यातील दुसरी अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे घडली आहे. यात 3 युवकांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.वर्धा नदीच्या चुनाळा घाटावरील आज(26 फेब्रुवारी) दुपारची ही घटना असून राजुरा आणि बल्लारपूर तालुक्यांच्या सीमेवरून वाहत असलेल्या वर्धा नदीपात्रात ही घटना घडली आहे. महाशिवरात्री निमित्त गावातील काही लोकं नदी घाटावर अंघोळीसाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. मात्र बुडालेले तिन्ही तरुण नदीच्या दुसऱ्या काठावर आंघोळीसाठी गेले आणि त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल असलेल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तुषार शालिक आत्राम (वय 17 वर्ष), मंगेश बंडू चणकापुरे (वय 20 वर्ष) आणि अनिकेत शंकर कोडापे (वय 18वर्ष) अशी मृतकांची नावं आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच राजुरा आणि बल्लारपूर पोलीस यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

