पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात उद्या दुपारी 12:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. तसेच, बस स्थानकातील जुन्या बसेससंदर्भातही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

पुणे : स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेचे पुणे जिल्ह्यात पडसाद उमटले असून विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी सरकारवर आणि पुणे पोलिसांना लक्ष्य करत टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला असून माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी स्वारगेट (Pune) बस स्थानकात जाऊन तोडफोड केली. याप्रकरणी, पोलीस प्रशासनानेही गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत. दुसरीकडे मंत्रालयीन स्तरावर या घटनेची दखल घेण्यात आली असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तत्काळ उद्याच मंत्रालयात बैठक बोलवली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात उद्या दुपारी 12:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. तसेच, बस स्थानकातील जुन्या बसेससंदर्भातही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराच्या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देश देखील मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेत संबंधित बसस्थानकावर त्यावेळी कर्तव्यात असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच, या बसस्थानकांवर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी, असेही निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील 7 दिवसात आपणास सादर करावा, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत.
जुन्या बसेसची विल्हेवाट लावा
बसस्थानक परिसरातील निर्लेखित केलेल्या जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कारण, या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने याच बसेस एकप्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनत आहेत, आणि त्यातूनच अशा घटनांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या निर्लेखित केलेल्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
सध्या "महिला सन्मान योजने" अंतर्गत महिलांना त्यांच्या प्रवास तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच त्यांची सुरक्षितता हा देखील मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट बसस्थानकावरील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
