चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
लग्न सोहळ्यात मामाला विशेष मान-सन्मान असतो. भाचा असो किंवा भाची दोघांच्याही पाठीशी लग्नात मामाच लागतो. तर, आपल्या भाच्याचं लग्न होतंय, म्हणून देखील मामा वेगळ्याच जोशात असतो.

सोलापूर : लग्न म्हटलं की आनंद, नाच-गाणं आलंच. अगदी हळदीच्या दिवसापासून वाजंत्री आणि मांडव लगीनघरी दिसून येतो. लग्न असलेल्या दोन्ही कुटुंबीयांच्या घरी आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असते. आत्या, मामा, काका आणि जवळची मित्रमंडळी लग्नासाठी काही खास नियोजन करत असतात. या लग्नसमारंभातील (Marriage) सर्वात आनंदाचा आणि उत्साह वाढवणार क्षण म्हणजे नवरदेवाची वरात. नवरदेवाची वरात निघल्यानंतर नातेवाईक व मित्र कंपनी आनंदाचे नाचतात, पैशांची उधळण करतात. ढोल-ताशावाल्याही अधिकचे पैसे देऊन आणखी वाजव.. असा संदेश देतात. त्यामुळे, लग्नाच्या वरातीची चर्चा आणि मजा वेगळीच असते. मात्र, सोलापुरात (Solapur) एका लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर भररस्त्यात चक्क अश्लील डान्स सुरू असल्याचे पाहून स्थानिकांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तसेच, याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आहे. संबंधित लग्नाच्या मिरवणुकीच व अश्लील डान्सच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवरदेवासह त्याच्या मामा आणि काकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, लग्नाच्या वरातीमधील डीजे देखील ट्रॅक्टरसह जप्त करण्यात आला आहे.
लग्न सोहळ्यात मामाला विशेष मान-सन्मान असतो. भाचा असो किंवा भाची दोघांच्याही पाठीशी लग्नात मामाच लागतो. तर, आपल्या भाच्याचं लग्न होतंय, म्हणून देखील मामा वेगळ्याच जोशात असतो. मात्र, सोलापुरातील एका लग्नात मामाचा हाच जोश लग्नकार्यात विघ्न घालणारा ठरला आहे. लाडक्या भाच्याच्या लग्नासाठी मामाने सोलापुरात चक्क नृत्यांगणा नाचवल्याचा आरोप करण्यात येत आहे. येथील लग्नाच्या वरातीत जोरात डीजेच्या तालावर गाणे वाजवली जात होती. तर, या डिजेच्या गाण्यावर नृत्यांगणांचा अश्लील नृत्यप्रकारही पाहायला मिळत होता. जावो चाहे मुंबई, दिल्ली, आगरा... या गाण्यावरही अश्लील डान्स सुरू होता. त्यामध्ये नृत्यांगणा हावभाव करत नाचताना दिसून येतात. या लग्नाच्या वरातीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटीझन्सकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी नवरदेव आणि मुलाच्या मामासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, नवरदेव शुभम फटफटवाले, मामा रवी मैनावाले , काकासाहेब जाधव, युसुफ पिरजादे आणि विशाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, लग्नाच्या वरातीतील डीजे, ट्रॅक्टरसह एकूण 80 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहिणींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
























