महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं निधन
महाराष्ट्राच्या पहिल्या पहिल्या निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. नीला सत्यनारायण कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी आणि तरल मनाच्या लेखिकाही होत्या.

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं आज (16 जुलै) निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 71 वर्षांच्या होत्या.
नीला सत्यनारायण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी झाला होता. त्यांच्या आईचं नाव सुशीला आणि वडिलांचं नाव वासुदेव आबाजी मांडके होत. ते पोलीस खात्यात होते. नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या 1965 साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी त्यांनी इंग्रजी वाङमय या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला.
सत्यनारायण या 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या पहिल्या निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरु केलं.
नीला सत्यनारायण कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी आणि तरल मनाच्या लेखिकाही होत्या. प्रशासनासोबतच लिखाणावरही त्यांची मजबूत पकड होती. संवेदनशील कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून 13 पुस्तकं लिहिली. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.
नीला सत्यनारायण यांची पुस्तके आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर) आयुष्य जगताना एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन) एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर) ओळखीची वाट (कवितासंग्रह) जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव) टाकीचे घाव डेल्टा १५ (प्रवासवर्णन) तिढा (कादंबरी) तुझ्याविना (कादंबरी) पुनर्भेट (अनुभवकथन) मी क्रांतिज्योती (अनुभवकथन) मैत्र (ललित लेख) रात्र वणव्याची (कादंबरी) सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
