Sanjay Mone on Sharad Ponkshe : 'नथुरामच्या भूमिकेसाठी शरदला पुरस्कार न देणं ही चुकच', संजय मोनेंचं व्यक्त केलं स्पष्ट मत
Sanjay Mone on Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नी नथुराम गोडसे बोलतोय या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. यावरच अभिनेते संजय मोने यांनी भाष्य केलं आहे.

Sanjay Mone on Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचा मुलगा चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावर विशेष लक्ष वेधून घेतलं ते संजय मोने (Sanjay Mone) यांच्या पोस्टने. संजय मोने यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक तर केलंच होतं, पण त्यांच्या नथुरामच्या भूमिकेचा विशेष उल्लेखही केला होता.त्यावर संजय मोने यांनी नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे.
संजय मोने यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी यावेळी नथुरामच्या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार द्यायला हवा होता, असं मतंही व्यक्त केलं. त्याचप्रमाणे नुथरामची भूमिका साकारताना त्यांनी जे धैर्य दाखवलं ते त्याचंही कौतुक त्यांनी यावेळी केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, नथुरामची भूमिका साकारताना त्याने जे धैर्य दाखवलं ते फार थोड्या जणांना जमतं.
त्याला पुरस्कार द्यायला हवा होता - संजय मोने
शरद पोंक्षेंचं ‘नथुराम गोडसे’ नाटक न पाहणं किंवा त्याला कुठलाही पुरस्कार न देणं, हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटलं की, 'चूक आहे. तुम्ही हलवाईशी वैर धरा, त्याला शिव्या घाला, त्याला वाटेल ते करा, पण मिठाई प्रेमाने खा. मिठाईशी वैर करू नका. त्याने उत्तम काम केलं होतं. त्याला पुरस्कार द्या. अभिनय आवडला, यासाठी कुठल्या परीक्षकाला प्रतिगामी कोणी म्हणणार नाही. निदान तसं म्हणू नये. आपल्याकडे बहुतेक तशी प्रथा नसावी, पण त्याला पुरस्कार दिला पाहिजे होता. केवळ त्याच्या त्या धैर्यापायी तरी विशेष पुरस्कार द्यायला पाहिजे होता. काम तर तो उत्तम करायचाच.'
... तर मी त्याला नक्की पुरस्कार दिला असता - संजय मोने
पुढे बोलताना संजय मोने यांनी म्हटलं की, 'जर त्या काळात मी परीक्षक असतो, तर मी त्याला नक्की पुरस्कार दिला असता. 'त्याच्या नथुराम नाटकाचा मी पहिला आणि शेवटचा प्रयोगही बघितला होता. दरम्यानच्या काळात आधी माझा प्रयोग असेल तेव्हा मी ते नाटक बघण्यासाठी पोहोचायचो आणि गुंग होऊन बघत राहायचो. त्याची ती संवादफेक आणि सर्व काही भारी होतं. माझ्यापेक्षा तो थोडा लहान. पण माझ्या आधीच्या पिढीतले कसलेले नट होते, त्यांची अशी लांब लांब स्वगत. त्याची उभं राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, ते दिसताना खूप मोठे दिसायचे. भव्यदिव्य दिसायला लागायचे. बरं त्या नटांना उंची वगैरे अधिक नसायची. डॉ. घाणेकर तसे बुटके होते, आमचा अतुल परचुरे त्याला उंची नाही, पण तो असा हिमालय वाटतो. आम्ही त्याला साहेब म्हणतो. साहेब खरंच मोठा कलाकार आहे. तर भूमिकेला उंची वगैरे नसते तर त्याला तुमचं ते जे असणं असतं ते पाहिजे असतं. शरद पोंक्षेकडे ते आहे, त्याला पुरस्कार द्यायला हवा होता. मी जर त्या काळात परीक्षक असतो तर मी त्याला नक्की पुरस्कार दिला असता, असंही संजय मोने यांनी म्हटलं.
ते धैर्य खूप कमी लोक दाखवतात - संजय मोने
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, एक दिवस त्याला विनय आपटे यांनी नथुरामच्या भूमिकेसाठी निश्चित केलं. तिथून त्याच्या आयुष्यामध्ये ३६० अंशात बदल झाला. तो संपूर्ण बदलला. मूळतः कुठेतरी एक गाठ बसलेली असते, बऱ्याच कलाकारांमध्ये ती गाठ असते. माझ्यामध्ये देखील आहे. ती गाठ एकदा निघाली ना, की तुम्ही मोकळे होता. जसं पू.ल देशपांडेच्या एका पुस्तकात आहे की, त्याच्या आयुष्यातला बोळा निघाला आणि पाणी वाहत झालं. तसंच त्याची गाठ निघाली असेल किंवा बोळा निघाला असेल. मी त्याच्या नथुराम गोडसेच्या पहिल्या प्रयोगाला गेलो होता, कारण तो आपला मित्र आहे. ते जे सगळं बघितलं आणि त्यानंतर त्याच्यावर जे काही प्रसंग ओढवतं होते, त्या परिस्थितीत तो करत होता. आता ती प्रणाली पटेल न पटेल. पण तो काम उत्कृष्ट करत होता. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु हे सगळं सहन करून त्याला काय मिळणार होतं. तर त्या भूमिकेमुळे त्याला नाव मिळणार होतं. ती अशी काही राष्ट्रपुरुषाची भूमिका नाही जी करून त्याचं नाव असं कुठेतरी उंचावर पोहोचले. पण त्याने नथुराम गोडसे करताना जे काही धैर्य दाखवलं, ते धैर्य खूप कमी लोक दाखवतात.'
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
