
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dilip Kumar Health Update : दिलीप कुमार यांची प्रकृती उत्तम अन् स्थिर; पत्नी सायरा बानो यांची माहिती
Dilip Kumar Health Update : अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशातच, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायरा बानो यांनी दिली आहे.

मुंबई : दिलीप कुमार यांची तब्येत पहिल्यापेक्षा उत्तम आणि स्थिर आहे, अशी माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे. 98 वर्षांच्या दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 29 जून रोजी दिलीप कुमार यांना मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एक आठवड्यापासून दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सायरा बानो यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, "दिलीप कुमार यांच्या तब्येतीत उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. अद्यापही ते आयसीयूमध्ये आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची तब्येत स्थिर असून सुधारणा होत आहे."
दिलीप कुमार यांना रुग्णालयातून कधीपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल? असा प्रश्न एबीपी न्यूजनं विचारल्यावर सायरा बानो म्हणाल्या की, "अद्याप यासंदर्भात डॉक्टरांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्हालाही दिलीप कुमार यांना लवकरात लवकर घरी घेऊन जायचं आहे. पण सध्या त्यांना डक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत डॉक्टर निर्णय घेतील."
सायरा बानो यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "सध्या दिलीप कुमार यांना प्रार्थनेती गरज आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, जेणेकरुन ते लवकरात लवकर ठीक होतील आणि आम्ही त्यांना लवकरात लवकर घरी घेऊन जाऊ शकू."
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याआधीही श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 6 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांत जमा झालेलं पाणी काढण्यासाठी एक लहान शस्त्रक्रियाही केली होती. त्यानंतर दिलीप कुमार यांना 11 जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
