अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
मेडिकल दुकानात सुरू असलेल्या मस्करीचा आणि भांडणाचा cctv व्हिडीओ आता समोर आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अहमदनगर : मित्रा-मित्रांमध्ये टिंगल टवाळी, चेष्टा मस्करी होतच असते. अनेकदा या चेष्टामस्करीतून वादही होतात. मात्र, चेष्टा मस्करीतून झालेला वाद मित्राच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका 20 वर्षीय युवकाचा खून (Crime News) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुकुंदनगर परिसरात एका मेडिकलमध्ये दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे असतांनाच शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान खान या आपल्याच मित्रावर कात्रीने हल्ला चढवला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर जखमी जिशान खान याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी उपचारा दरम्यान जिशान खान या युवकाचा मृत्यू झाला आहे.
दोन मित्रांमधील एकमेकांची मस्करी जीवावर बेतल्याने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणेही तिककेच गरजेचे आहे. अनेकदा समोरच्या व्यक्तीची सहन करण्याची क्षमता पाहून आणि त्याच्या संवेदनांना ठेस पोहोचेल अशी करु नये. महाविद्यालयातही रॅगिंगच्या अशाच घटना घडत असतात. त्यातून, अनेकदा नैराश्याच्या भावनेतून विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतात, अशाही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आता, मेडिकल दुकानात सुरू असलेल्या मस्करीतून एकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांमधील भांडणाचा cctv व्हिडीओ आता समोर आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हल्ला करणारा आरोपी शमसुद्दीन खान हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेची शहरात जोरदार चर्चा असून चेष्टा-मस्करीलाही मर्यादा असायला हव्यात, असाच सूर नागरिकांचा उमटत आहे.
हेही वाचा