BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
BJP sankalp Patra: भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर केले. अनेक मोठ्या योजनांची आणि आश्वासनांची खैरात
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी मुंबईत पक्षाचा जाहीरनामा (संकल्पपत्र) प्रसिद्ध केला. यावेळी भाजपने राज्यातील शेतकरी, तरुण, वृद्ध आणि महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. राज्यात पु्न्हा महायुतीची सत्ता आल्यास पहिल्या 100 दिवसांत 'व्हिजन महाराष्ट्र 2029' हा रोडमॅप तयार करुन त्यानुसार वाटचाल केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आगामी पाच वर्षांमध्ये आमचे महायुती सरकार गडकिल्ल्यांचे जतन करण्यासाठी प्राधिकरण तयार करेल. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अर्धा ट्रिलियनचा मार्क पूर्ण केलाय, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (BJP election manifesto 2024)
भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा
भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी भावांतर या महत्त्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत ज्याठिकाणी शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळेल, तिकडे भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. तसेच शेतकरी जे काही खत खरेदी करतात, त्यावरील जीएसटी आमचे सरकार परत करेल. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी मूल्य साखळी तयार करण्याची घोषणा भाजपच्या संकल्पपत्रात करण्यात आली आहे.
वीजबिलात 30 टक्के सूट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संकल्पपत्राचे वाचन केले. त्यांनी सांगितले की, गेल्या अडीच वर्षात आम्ही सरकारी नोकऱ्यांवरील निर्बंध हटवून आम्ही 1 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या. आता आमचा प्रयत्न आहे की, गरीब आणि मध्यमवर्गीयांना सौर आणि अक्षय उर्जेचा वापर करुन वीजबिलात 30 टक्के सूट देण्याचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या 11 लाख लखपती दिदी आहेत, 2027 पर्यंत राज्यात 50 लाख लखपती दीदी असतील. गरिबांसाठी अक्षय्य अन्न योजना सुरु करणार, अशी घोषणा भाजपकडून करण्यासाठी
राज्यात 25 लाख रोजगारांची निर्मिती
आगामी काळात राज्यात 25 लाख रोजगारांची निर्मिती करणार असल्याची घोषणा भाजपच्या संकल्पपत्रात करण्यात आली. आगामी काळात महाराष्ट्राला फिनटेक आणि आर्टिफिशिल इंटेलिजन्स (AI) हब करण्याचे उद्दिष्ट. आगामी काळात या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राला फिनटेक आणि आर्टिफिशिल इंटेलिजन्स (AI) हब करण्याची योजना. याशिवाय, राज्यात एनरॉटिकल आणि अंतराळ क्षेत्रातील रोजगारनिर्मितीचे काम केले जाईल, अशी घोषणा भाजपच्या संकल्पपत्रात नमूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महारथी म्हणजे अॅडनव्हान्स रोबोटिक आणि एआय ट्रेनिंग हब्स लॅब्स सुरु करणार. या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणार. याशिवाय, महायुती सरकार राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र सुरु करेल. या माध्यमातून स्टार्टअप करणाऱ्या तरुणांना एकत्रित पद्धतीने प्लग अँण्ड प्ले सुविधा पुरवणार, जेणेकरुन त्यांना उद्योगासाठी भांडवल लागणार नाही. तसेच विविध महामंडळाच्या माध्यमातून उद्योगासाठी 15 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, असे आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रात देण्यात आले आहे.
आणखी वाचा