संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
एकीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटविण्याची मागणी केली असता, दुसरीकडे हा होळकर कुटुंबीयांचा अवमान असल्याचे संजय सोनवणी यांनी म्हटलं आहे.

मुंबई : औरंगजेबाच्या कबरीचा वाद शमतो ना शमतो तोच आता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावरील (Raigad) वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आला आहे. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठलाही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा तेथून हटविण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तर, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही त्याचे समर्थन करत इतिहासात वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नसून तो राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून आल्याचे म्हटले होते. आता, वाघ्या कुत्र्या संदर्भात कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही हे खोटे आहे, शिवाजी महाराजांसोबत वाघ्या कुत्रा होता हे त्यांच्याच अनेक शिल्पातून समोर आलय. संभाजी महाराजांनी (Sambhajiraje) वाघ्या कुत्रा हटवण्याची जी मागणी केली, त्या मागणीला आमचा विरोध आहे. कारण या संदर्भातले ऐतिहासिक संदर्भ आहेत, असे इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे.
एकीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटविण्याची मागणी केली असता, दुसरीकडे हा होळकर कुटुंबीयांचा अवमान असल्याचे संजय सोनवणी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा मी आदरच करतो, पण त्यांनी इतिहास समजून घ्यावा आणि त्यानंतरच वाघ्या कुत्रा हटवण्याची मागणी करावी, असेही सोनवणी यांनी म्हटले. संभाजी महाराजांनी वाघ्या कुत्रा हटवण्याची मागणी केली, त्यामुळे एका अर्थाने होळकर कुटुंबीयांचा देखील हा अवमान आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी आताच का केली जाते, यासाठी कोणते संदर्भ जोडले जातात हे संभाजीराजे यांनी सांगावे असे आवाहन संजय सोनवणी यांनी केलं आहे.
वाघ्या कुत्र्यांसंदर्भात इतिहास तज्ज्ञांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे काही इतिहासकार वाघ्या कुत्र्याबाबत कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही असे म्हणतात तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात ऐतिहासिक उल्लेख आहे, असे म्हटले. त्यामुळे नेमका विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यावर बोलताना संजय सोनवणे म्हणाले. अनेक इतिहास तज्ज्ञांचे राजकीय सामाजिक संबंध असतात आणि हेतू देखील असतात. काही इतिहास तज्ज्ञ प्रसिद्धीसाठी देखील असे अनेक संदर्भ जोडतात. त्यामुळे नागरिकांनी सतत विवेक बुद्धी जागी ठेवून यावर विचार करावा आणि इतिहास समजून घ्यावा, अशी प्रतिक्रिया संजय सोनवणी यांनी दिली.
तर आम्ही हायकोर्टात जाऊ
संभाजीराजेंच्या मागणीनुसार जर हा पुतळा हटवण्याला मान्यता मिळाली तर आम्ही हायकोर्टात जाऊ, या आधी देखील मी या संदर्भात उपोषण केले आहेत. धनगर समाजाचा आणि होळकर कुटुंबीयांचा देखील याला विरोध आहे. पण, इतिहास तज्ज्ञ म्हणून मी सांगतो इतिहास समजून घेऊनच या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी संजय सोनवणी यांनी केली आहे.
















