Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला महागडी रोल्स रॉईस कार देणारा कोण? चीटफंड घोटाळ्यातील गाडी कोरटकरच्या मित्राकडे आली कशी?
Prashant Koratkar: आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रोल्स रॉईस कार नक्की कोणाची आहे? हे सांगण्यास प्रशांत कोरटकरने नकार दिला आहे.

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोरटकरचा शोध सुरु असताना त्याच्या मालमत्ता, संपत्तीचे तपशील पुढे आले होते. चीटफंड घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारची आलिशान कार कोरटकर वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे. आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रोल्स रॉईस कार नक्की कोणाची आहे? हे सांगण्यास प्रशांत कोरटकरने नकार दिला आहे.
रोल्स रॉईस ज्याची त्या मित्राचं नाव सांगण्यास नकार
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह्य विधानं केल्याबद्दल प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीआयडी तपास अधिकाऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांना पत्र लिहून कोरटकरकडे रोल्स रॉईसबाबत चौकशी करण्याची विनंती केली. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला याबाबत विचारलं असता त्याने ही रोल्स रॉईस ज्याची आहे त्या मित्राचं नाव सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकरचा तो मित्र कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. समृध्द जीवन घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर असलेल्या रोल्स रॉईस कार जप्त करुन तीचा लिलाव होणार होता. मात्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ही आलीशान गाडी परस्पर एका तिसऱ्या व्यक्तीने विकत घेतली. त्याच्याकडून ती कोरटकरकडे आली. मात्र कोरटकरचा हा मित्र कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
तो मित्र कोण आहे?
ही रॉल्स रॉईस कार प्रशांत कोरटकरकडे कशी आली? याचा तपास करण्यासाठी सीआयडीने कोल्हापूर पोलिसांना पत्र दिलं आहे. कोरटकरला जेव्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तेव्हा सीआयडीने कोल्हापूर पोलिसांना पत्र देऊन विनंती केली, या कारबाबत प्रशांत कोरटकरकडे विचारणा करावी, तेव्हा कोल्हापूर पोलिसांनी या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरला याबद्दल विचारलं. मात्र, ही कार नेमकी कोणाची आहे? त्याच्या कोणत्या मित्राची आहे? हे सांगण्यास प्रशांत कोरटकरने नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तो मित्र कोण आहे? त्याचं नाव कोरटकर का घेत नाही? त्याच्या पुढचा विभाग म्हणजे एका घोटाळ्यातील गाडी या प्रशांत कोरटकरच्या मित्राकडे आली कशी? त्याला कोणी मदत केली? हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
























