Pune Crime: साताऱ्याच्या गौरीचा बंगळुरुत सुटकेसमध्ये मृतदेह, महिनाभरापूर्वी मुंबईतून शिफ्ट झालेल्या पती राकेशने पत्नीला का संपवलं?
Bengaluru Murder News: नवरा-बायको मुंबईतून बंगळुरुला गेले, महिना उलटत नाही तोच राकेशने पत्नीला संपवलं, गौरी सांबरेकरचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून पळ काढला.

बंगळुरु: बंगळुरुत एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही पती-पत्नी मूळचे महाराष्ट्रातील आहेत. राकेश राजेंद्र खेडेकर (वय 36) असे या पतीचे नाव आहे. राकेश आणि त्याची पत्नी गौरी सांबरेकर (वय 32) हे दोघे मुंबईत राहत होते. महिनाभरापूर्वीच राकेश आणि गौरी बंगळुरुला (Bengaluru Murder) राहायला गेली होती. हे दोघे दक्षिण बंगळुरुतील दोड्डकम्मानहल्ली परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. राकेशने मंगळवारी गौरीची चाकू भोसकून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये टाकला. यानंतर राकेश पळून पुण्यात आला होता.
पुण्याला आल्यानंतर राकेशने (Rakesh Khedekar) बुधवारी बंगळुरुतील त्याच्या घरमालकाला फोन केला. यावेळी त्याने पत्नी गौरी सांबरेकर (Gauri Sambrekar) हिची हत्या केली असून तिचा मृतदेह फ्लॅटमधील सुटकेसमध्ये असल्याचे सांगितले. हे ऐकून घरमालक घाबरला आणि लगेच फ्लॅटवर गेला. तेव्हा फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता. घरमालकाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा राकेश खेडेकर याचा मोबाईल सुरु होता. तेव्हा बंगळुरु पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने राकेश खेडेकर याला गाडी चालवत असताना ताब्यात घेतले.
मृत गौरी सांबरेकर ही मूळची साताऱ्याची असून तिने मास मिडीयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. ती बंगळुरुत नोकरी शोधत होती. तर राकेश खेडेकर हा एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. महिनाभरापूर्वीच हे दोघे बंगळुरुत राहायला आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
राकेशने चाकू भोसकून गौरीचा खून केला
पोलिसांनी पुण्यातून राकेशला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने झुरळ मारण्याचे औषध प्यायले होते. त्यानंतर राकेश खेडेकर याची थोडीफार चौकशी करण्यात आली. यावेळी राकेश याने गौरीची हत्या केल्याची कबुली दिली. राकेशवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राकेशने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री जेवताना या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी राकेशला संताप आला आणि त्याचा संयम सुटला. त्याने किचनमधील सुरी घेऊन गौरीला दोन-तीन वेळा भोसकले. यामध्ये गौरीचा जागीच मृत्यू झाला.
राकेश खेडेकर याने गौरीच्या हत्येचे नेमके कारण अद्याप सांगितलेले नाही. आमच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले, एवढेच तो सांगत आहे. या घटनेनंतर राकेशला प्रचंड मानसिक धक्का बसला असून तो फारसे बोलत नाही. आम्ही त्याची चौकशी करुन माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
आणखी वाचा























