(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : कल्याणच्या गायकवाड चाळीत पोलिसांचा छापा, तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त
Mumbai Crime News : या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव याच्यासह इसरार अहमद, विनोद गंगवाणी आणि आणखी दोन साथीदार पसार झाले आहे.
Mumbai Crime News : कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीत छापा टाकून तब्बल 7 लाखांचा गुटखा (Gutkha) जप्त केला आहे. या गुटख्याचा साठा गायकवाड चाळीमधील एका खोलीत साठवून ठेवण्यात आला होता. त्याची विक्री करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकत हा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव याच्यासह इसरार अहमद, विनोद गंगवाणी आणि आणखी दोन साथीदार पसार झाले आहे. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी परिसरातील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीतील एका खोलीमध्ये बेकायदेशीरित्या गुटख्याच्या साठा असून, खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस अधिकारी उल्हास जाधव, दिनकर पगारे यांच्या पथकाने गायकवाड चाळीतील खोलीत छापा टाकला. या खोलीत तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी मनीष यादव, इसरार अहमद, विनोद गंगवाणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. विशेष म्हणजे, यामधील मनीष यादव हा मुख्य सूत्रधार असून, त्याचे साथीदार पसार आहेत. तर, इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा कुठून आणला?, कुणाला विकणार होते? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
जालन्यात 81 हजारांचा गुटखा पकडला...
तिकडे जालना जिल्ह्यात देखील आधीच काही कारवाई करण्यात आली आहे. जुना जालन्यातील नरीमननगरातील एका घरात छापा मारून पोलिसांनी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या प्रतिबंधीत पानमसाला, गुटखा आदी मिळून एकुण 81 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या अधिपत्याखालील पिंक पथकसह कदिम जालना पोलिसांनी केली आहे. यावेळी रॉयल 717 कंपनीचे 85 पाकिट, जाफराणी जर्दा कंपनीचे 200 पुडे, राजनिवास पान मसाला व गुटख्याचे 56 पाकीट, सिग्नेचर पान मसाल्याचे 56 पाकीट आणि हिरा कंपनीचे 92 पाकीट असा एकूण 81 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. सदर माल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या:
गुजरातहून आलेला लाखोंचा गुटखा जप्त; धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई