एक्स्प्लोर
Advertisement
'लालडब्बा'
तिचं हे समांतर धावणं सुरुच राहिलं पाहिजे. कारण, आपण स्वत: धावत असतांना कुठे थांबलो, धडपडलो तरी सावरुन घ्यायला ती आहे. हा सुद्धा एक खूप मोठ्ठा दिलासा आहे. म्हणून लालडब्बा हवाच. तो कधीच 'संप'ता कामा नये
"टिंग टिंग... चला पुढे चला, उतरणारे पुढच्या दरवाजाला...मधल्या स्टॉपला गाडी थांबत नाय...चला सरकत राहा..पास, सुट्टे काढून ठेवा..."
खूप वर्ष झाली अशी हाळी ऐकून. काल मुंबईतल्या बेस्ट बसचा संप संपला आणि बस रस्त्यावर उतरल्या. प्रवाशांनी भरभरुन धावू लागल्या. अशाच एका बसमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला चढले...आणि मी प्रवास केलेल्या सिटी बसच्या लालडब्ब्याची तीव्रतेनं आठवण झाली... पुन्हा दोन बेलचा आवाज कानावर पडला...मन बरीच वर्षे मागे गेलं...
एकवेळ अशी होती की दोन बेलचा हा आवाज पहाटे पाचला झोपेतही ऐकू यायचा. सकाळी सातच्या शाळेला वेळेत पोहोचायचं असेल आणि बोचऱ्या थंडीत हातावर पडणाऱ्या छड्या चुकवायच्या असतील तर नाशिकमध्ये आमच्या घरापासून 7-8 किमी असलेल्या माझ्या शाळेत जायला सिटी बस हा परवडणारा एकमेव पर्याय होता. बस वेळेवर गाठायची आणि त्यात खिडकीजवळ हवी ती सीट मिळवायची म्हणजे पहाटे पाचला उठावंच लागे. तसं, शाळा शिकण्यासाठी बऱ्याच आत्मचरित्रांत वाचला तसा मला काही खडतर प्रवास वगैरे करावा लागला नाही.
पायाखालची वाट डांबराची होती. बस पास संपला की नवा काढून मिळायचा. शिवाय पास हरवला वगैरे तर तिकीटापुरते पासच्याच पाकिटात असलेले पाच रुपये पण फिक्स डिपॉझिट म्हणून दिलेले असायचे. मध्यमवर्गातल्या जरा वरच्या स्तरातल्या पोरांना शाळेत न्यायला-आणायला रिक्षावाले काका असायचे. आम्ही मात्र, अस्सल मध्यमवर्गीय. आमच्यासाठी रिक्षा म्हणजे निव्वळ चैन. शाळेत जाण्यासाठी आम्ही कधी काट्याकुट्याचा रस्ता तुडवला नाही म्हणून त्याला कुणी संघर्ष म्हटलं नाही. पण, सलग 10 वर्ष लाल डब्ब्याच्या बसमधून धक्के मारत आणि खात केलेला प्रवास हा मध्यमवर्गीय संघर्षाचा उत्तम नमुना आहे. हा संघर्ष मुंबईत आल्यानंतर लोकलमध्ये आणि रस्त्यानं चालतांना पण करावा लागतो. पण गावातल्या पीचवर तयार झालेले खेळाडू असल्यानं त्या संघर्षाचं मला फार काही वाटलं नाही.
आताही ती दुरुन येतांना दिसली तरी हात नकळत खांद्यावर जातात. कारण जुनी सवय. लाल रंगाचं धुळीनं भरलेलं एखादं अजस्त्र धूड लांबूनच येतांना दिसलं तरी त्यावरची पाटी वाचण्याआधीच आम्ही खांद्यावरच्या दप्तराचे पट्टे आवळून सज्ज व्हायचो. बरेचदा "ओ दादा, ओ काका, ऐ मावशी" करत मी चिंचोळ्या दरवाजातूनही गनिमी कावा करत वाट काढलीय. कंडक्टर नेहमीचेच असतील तर दुरुनच काँग्रेसचा पंजा दाखवून 'पास' असल्याची खूण करायची. ड्रायव्हर गरम झालेल्या इंजीनाच्या डब्ब्यावर पहाटेच्या थंडीत बसायची मज्जा काही औरच. आमच्यात तर त्या गरम झालेल्या इंजीनावर बसण्यासाठीही नंबर लागायचे. तिथे बसलं की गिअर ड्रायव्हर टाकायचा पण सर्वांच्या पुढे बसून आख्ख्या बसचं सारथ्य आपणच करतोय असं वाटायचं.
या लालडब्ब्याच्या खिडकीनंच मला माझं शहर दाखवलं. इथल्या गर्दीनंच 'दे धक्का नाही तर खा धक्का' हे गणित शिकवलं. उमलत्या काळात काही वखवखलेले, चोरटे स्पर्शही इथंच झाले तर रोज 'खास' कुणासाठीतरी जागा पकडण्याची धडपडही इथंच पाहिलीय. तिकीटासाठी पैसे नसलेल्या जख्ख म्हाताऱ्याचं तिकीट स्वत:च्या खिशातून पैसे देत फाडणारा कंडक्टरही इथंच आणि त्याच कंडक्टरसोबत सुट्ट्यांसाठी होणारं महाभारतही इथंच पाहिलं. मी प्रवास केलेल्या सिटीबसमध्ये त्यावेळी महिला आरक्षणाची वगैरे सोय नव्हती. पण एखादी पोटुशी अगदी बिनधास्त भर गर्दीत चढायची आणि तिला जागा देणाराही आपण कुणी महामानवाचा अवतार असल्याचे एक्सप्रेशन द्यायचा नाही. आमचा खास आणि लाडक्या हाकेचा मालक असलेला हा 'लालडब्बा' असाच गोंगाट करत, हसत-खिदळत, भांडत पण अगदी डौलदार पणे धावायचा.
आज या लालडब्ब्यातून प्रवास करणाऱ्या अनेकांचा प्रवास मर्सिडीज, बीएमडब्ल्यूपाशी जाऊन थांबलाय. आमची गाडी तशी मध्यमवर्गातच असली तरी ओला-उबेर, मेट्रोच्या वाटेनं धावतेय. पण, आजही संपाच्या निमित्तानं का होईना हा लालडब्बा रस्त्यावर दिसला नाही तर शहर ओकंबोकं वाटायला लागतं.
दुसऱ्या गावाला जातांनाची एसटीही डोंगर-दऱ्या, पळणारी झाडं दाखवत जाते. तिच्या खिडकीशी बसून अनेकांना कविता सुचतात, गार वाऱ्याच्या झोतानं ब्रम्हानंदी टाळी लागावी अशी डुलकीही लागते. पण, सिटी बस? ही डोंगरदऱ्या, पळणारी हिरवी झाडं दाखवत नाही. ही तुमचंच शहर तुमच्याच साक्षीनं पळतांना दाखवते. तुमचं शहर किती वेगानं, झपाट्यानं बदलतंय हे ती दाखवते. आधी बऱ्यापैकी वेगानं पळणारी लालडब्बा बस मग रडतखडत गर्दीतून भोंगे वाजवत चालू लागते. आधी धुळीनं माखलेली पण एखाद्या अजिंक्य योद्ध्याच्या रुबाबात येणारी ती आता एवढ्याशा तीन चाकी धिटुकल्या रिक्षांचे ओव्हरटेकही सहन करते. तिच्या उंचावरच्या खिडकीतून गरम हवा आणि धूर आत ओढून घेत ती सिग्नलवर थांबलेल्या एसी काचांआडचा गारवा मनानंच न्याहाळते.
तिच्या डोक्यावरची, तिचं नाव सांगणारी रंगांच्या कपच्या उडालेली पाटी आता कुणी वापरत नाही. आता तिथं बसस्टॉपची नावं सांगणारा इलेक्ट्रिक बोर्ड आला आहे. या लालडब्ब्यात बसवलेल्या स्पिकरमधून आपल्याला आल्या-गेल्या बस्टॉपचं नाव सांगणारी एक इलेक्ट्रिक बाई पण असते. आता तोंडानं "तिकीट... तिकीट" अशा हाळीला साथ देणारा घुंगरु बांधलेल्या छोट्या पंचिंगचा चुटूक-चुटूक आवाज होत नाही. तिकीट डायरेक्ट छापून येतंय. अशाच एखाद्या तिकीटावर 'रसीदी टिकट' सारखं घाईतलं पण अजरामर साहित्य जन्माला येतं. एखादा महत्वाकांक्षी प्रवास पूर्ण झाल्यावर त्या प्रवासातलं ते तिकीट 'लकी तिकीट' म्हणून आयुष्यभर सांभाळलंही जातं.
प्रवास करणं म्हणजेच बदलाच्या दिशेनं पुढे जाणं. हा बदल किती भला किती बुरा हे परिस्थिती ठरवतेच. पण, या बदलाच्या दिशेनं जिनं पुढे नेलं, जिनं खडखडाट करणाऱ्या लालडब्ब्यातून सुटून आलिशान, थंड हवेच्या प्रवासाची स्वप्न दाखवली, ती पूर्ण करण्याची धडपड, जिद्द दिली. त्या लाडक्या लालडब्ब्यातून आम्ही विकासाच्या नव्या वाटेनं पुढे गेलो. दुचाकी, चारचाकी, लोकल, मेट्रो असे गतीचे रुळ बदलत राहिले. कधी रस्त्यात गाडी बंद पडली, तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली, सुनसान रस्त्यावरची रात्र घालवावी लागली तर मात्र याच लालडब्ब्यानं जवळ घेतलं. या लालडब्ब्याचे दरवाजे आतून कधीच बंद झाले नाहीत. तिच्यातून बाहेर पडणाऱ्यांनी पुढचा प्रवास जरुर करावा. तो प्रवास अधिक विकासाचा, अधिक वेगाचाही असावा. पण, या विकास नावाच्या प्रवासासोबत ती आजही रडत-खडत, लंगडत का होईना पण समांतर धावतेय. आत येणाऱ्यांना जवळ घेतेय, तिच्यातून बाहेर जाणाऱ्यांना खुशीनं निरोप देतेय.
फक्त तिचं हे समांतर धावणं सुरुच राहिलं पाहिजे. कारण, आपण स्वत: धावत असतांना कुठे थांबलो, धडपडलो तरी सावरुन घ्यायला ती आहे. हा सुद्धा एक खूप मोठ्ठा दिलासा आहे. म्हणून लालडब्बा हवाच. तो कधीच 'संप'ता कामा नये
(या लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक आहेत.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement