एक्स्प्लोर
ट्रम्प निवडीनंतरची अमेरिका - कला, विज्ञान आणि राजकारण
अमेरिकेचा इतिहास जगणारं बोस्टन, अमेरिकेच्या आर्थिक संपन्नतेचं प्रतीक न्यूयॉर्क आणि महासत्तेचं सत्ताकेंद्र वॉशिंग्टन डीसी. तीन आठवड्यांच्या सुट्टीदरम्यान अमेरिकेतल्या या तीन शहरांनी आणि त्यांदरम्यानच्या प्रवासानं मला या देशाचं बदलतं रूपही दाखवलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर झालेली राजकीय उलथापालथ अनुभवण्याची संधी मला मिळाली. त्यातलेच काही अनुभव मी ब्लॉगच्या माध्यमातून मांडले होते. पण काही गोष्टी लिहायच्या राहून गेल्या. माझ्या प्रवासातली अशीच काही टिपणं या ब्लॉगमध्ये मांडते आहे.
कलेचं राजकारण
बोस्टनचं म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स म्हणजे कलाप्रेमींसाठी अलिबाबाची गुहाच आहे. अमेरिकन, युरोपियन, आशियाई कलेचे उत्तमोत्तम नमुने तिथं मांडण्यात आले आहेत. क्लॉद मोने, पाब्लो पिकासो, जॉर्जिया ओ'किफी, जॉन सिंगर सार्जंट, थॉमस सली अशा दिग्गजांचा कलाविष्कार पाहण्याची संधी या संग्रहालयात मिळते. ते केवळ संग्रहालय नाही, तर तिथं एक आर्ट स्कूलही चालवलं जातं. साहजिकच इथल्या कलादालनांची सफर करताना कधी परीक्षण-समीक्षण करणारे विद्यार्थी, त्यांना कलाकृतींचं महत्त्व समजावणारे शिक्षक, रेखाटनं करणारे तरुण कलाकारही भेटतात.
या संग्रहालयातल्या 'ट्रायम्फ ऑफ द विंटर क्वीन' या पेंटिंगनं माझं लक्ष वेधून घेतलं. इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची कन्या एलिझाबेथ स्टुअर्टची कहाणी सांगणारं पेंटिंग. एलिझाबेथ बोहेमियाची राणी बनली, मात्र वर्षभरातच तिचा पती फ्रेडरिकला सत्ता सोडावी लागली. (म्हणूनच तिला 'विंटर क्वीन' हे नाव पडलं) देशोधडीला लागलेलं एलिझाबेथचं कुटुंब प्रेम, युद्ध, विरह, मृत्यू यांचा सामना कसं करतं, ते हे पेंटिंग दर्शवतं.
हे चित्र रेखाटण्यात आलं, तेव्हा एलिझाबेथ विस्थापितांचं आयुष्य जगत होती. पण तिच्या मृत्यूपश्चात तिचा नातू जॉर्ज इंग्लंडच्या सिंहासनावर विराजमान झाला. 1714 साली जॉर्ज पहिला सत्तेत आल्यानंतरच इंग्लंडनं खऱ्या अर्थानं जगावर राज्य करण्यास सुरूवात केली. इंग्लंडचं सध्याचं राजघराणं त्याच जॉर्जचे वंशज आहेत.
माझ्यासोबतच काही विद्यार्थी त्या पेंटिंगचा अभ्यास करत होते. त्यांच्या शिक्षकांनी, इथन यांनी मांडलेला एक विचार मनात घर करून राहिलाय.
‘प्रत्येक चित्र, अगदी एखादं व्यक्तीचित्रही एक कहाणी सांगतं. फक्त त्यातल्या व्यक्तींची कहाणी नाही, तर त्या काळातल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीची कहाणीही चित्रात शोधण्याचा प्रयत्न करा. एलिझाबेथच्या आणि तिच्या मुला-मुलींच्या चेहऱ्यांवरचा प्रकाश, दिवंगत फ्रेडरिकमागचा कवडसा जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच या चित्रातला अंधारही महत्त्वाचा आहे. एलिझाबेथच्या रथाखाली मृत्यू चिरडला जातो आहे. अशा अंधारलेल्या जागाच एखाद्या कलाकृतीचं खरं रूप दाखवतात. एक विस्थापित राणी हार मानत नाही, तिचेच वंशज पुढं जगावर राज्य करतात.’
एका विद्यार्थ्यानं त्यावर पटकन टिप्पणी केली, ‘We should show this painting to a certain Mr. Trump.’ ट्रम्पना हे चित्र दाखवायला हवं. आम्ही सगळेच हसलो. पण खरंच, ट्रम्पना आणि युरोपातल्या अनेक नेत्यांना हे चित्र दाखवायला हवंच.
कलाकार, शास्त्रज्ञ आणि राजकारणी
बोस्टनचं म्युझियम ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. वैज्ञानिक सिद्धांत साध्या-सोप्या भाषेत अगदी लहान मुलांनाही समजतील अशा पद्धतीनं इथं समजावून सांगितले जातात.
या संग्रहालयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे थिएटर ऑफ इलेक्ट्रिसिटी. वीजेवर संशोधन करणारे बेंजामिन फ्रँकलिन बोस्टनचेच रहिवासी होते. त्यांच्या भूमीत वीजेची गुपितं उघड करणारं हे दालन आहे. वीजेचा नाच आणि त्यातली अचाट शक्ती पाहण्याची संधी इथं मिळते. आणि हो, या दालनाचं अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही जवळचं नातं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे काका डॉ. जॉन जी ट्रम्प हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमध्ये प्रोफेसर होते. डॉ. ट्रम्प यांनी हाय व्होल्टेज रेडिएशनवर, किरणोत्सारावर काम केलं होतं. त्यांच्या एक्स रे जनरेटर्सचा फायदा कॅन्सर पेशंट्सना झाला. एक मनमिळावू, हसतमुख आणि शांत स्वभावाचा शास्त्रज्ञ अशी जॉन ट्रम्प यांची प्रतिमा होती. (पुतण्या काकांवर गेला असता तर, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही.)
तर याच जॉन ट्रम्प यांचं थिएटर ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या उभारणीला हातभार लावला होता. तिथला वीजेवरचा शो पाहताना माझ्या गटातला एका जेमतेम १० वर्षांचा मुलगा – मॅट, त्याच्या वडिलांना पीटरना, बेंजामिन फ्रँकलिनविषयी विचार होता. बेंजामिन फ्रँकलिन केवळ संशोधक नव्हते, तर एक राजकारणीही होते. फ्रँकलिन यांनी अमेरिकेच्या निर्मितीलाही हातभार लावला होता. तीच कहाणी वडिलांनी मुलाला ऐकवली. आम्ही सगळेजण वीजेवरचा शो संपल्यावर पुढच्या दालनातील लिओनार्डो डा विंचीवर आधारीत प्रदर्शन पाहायला गेलो. डा विंचीनं दिलेल्या आराखड्यांवर आधारीत सायकल, हेलिकॉप्टर, ग्लायडर्स अशा मशीन्सची मॉडेल्स तिथं मांडण्यात आली आहेत. आणि अर्थातच मोनालिसा, द लास्ट सपर यांसारख्या पेंटिंग्सची रहस्य उलगडणारी माहितीही तिथं मिळते.
मॅटचे प्रश्न सुरूच होते. ‘डा विंची तर आर्टिस्ट होता, मग सायन्स म्युझियममध्ये त्याचं काय काम?’ पीटरनं मॅटला डा विंची कसा प्रतिभावान होता, कलेसोबतच त्याला विज्ञानाची आवड कशी होती ते सांगितलं. मॅटचा पुढचा प्रश्न अगदी भन्नाट होता – ‘Why don’t we also have artists who are scientists and scientists who are politicians?’ मॅटच्या त्या प्रश्नानं आम्हा सर्वांनाच निरुत्तर केलं. पीटरनं मॅटला जवळ घेत म्हटलं,‘Why don’t you try to be one?’ मॅट खळखळून हसला.
मॅटच्या लकाकणाऱ्या डोळ्यांत मला अमेरिकेचं भविष्य हसताना दिसलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement