BLOG : गिटारिस्ट ते गायक: भुपिंदरच्या पहाडी आवाजाचा प्रवास!
देव आनंदने एक सीन पंचमला सांगितला... सगळे नशेडी पार्टी करतायेत... यावर गाणं बनेल का... इतकं सांगून देव साहेब आणि पंचम निघत होते तेवढ्यात गिटारचे काही स्वर त्यांच्या कानावर पडले... ते ऐकून पंचम मागे वळला... ज्याच्या हातात गिटार होती त्याला म्हणाला... बास्स हेच माझं गाणं आहे... गाणं होतं "दम मारो दम", आणि गिटार ज्याच्या हातात होती तो दुसरा कोणी नसून "भूपिंदर सिंह", होता...
"मेरा बस चले तो में भूपिंदर की आवाज ताबीज बनाकर पहन लूं", असं म्हणणारा कोण असेल? तर माझा गुलजार! ज्याच्या लिहिलेल्या गाण्यांवर कोणी गाणी गायली नसतील? पण त्याला कुणाचा आवाज आवडायचा... किंबहुना आवडतो तर भूपिंदरचा. अजब आहे नाही का? कदाचित त्या साठीच त्याने "नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही मेरी पहचान है" ही किनारा चित्रपटासाठी गाणं लिहिलं होतं... ते लता दीदींना गाण्याचा आग्रह केला... पण त्यात भूपिंदरला पण शामिल केलं... लता दिदिंसाठी तुम्ही नेहमी हे गाणं ऐकत असाल, मी भूपिंदरसाठी ऐकतो... कारण खरंच त्याचा आवाज इतर कोणत्याही बॉलिवूड प्ले बॅक सिंगर सारखा नाहीये... किंचित पण नाहीये... म्हणून भूपिंदरचा देखील या गाण्यावर लता दीदी ऐवढाच हक्क आहे...
अच्छा पण हाच माणूस एकेकाळी संगीतापासून लांब पळत होता... त्याला चीड यायची संगीताची... कारण काय तर वडील प्रसिद्ध संगीतकार... जे जबरदस्ती लहानपणी याला रियाजाला बसवायचे... पण संगीत स्वतःच एक नशा आहे... मनापासून जरी प्यायला नाहीत तरी तिचं काम ती करतेच... इथे पण तेच झालं... भूपिंदर अखेर संगीत क्षेत्रातच आला आणि मोठा... खूप मोठा होऊन गेला....
मदन मोहन... माहीत आहेत ना? त्यांनी म्हणे पहिला ब्रेक दिला याला... पण खय्यामनं पहिलं सोलो गाणं दिलं... चेतन आनंद तर "आखरी खत" साठी राजेश खन्ना ऐवजी भूपिंदरला घेणार होता म्हणे... पण भूपिंदारनं आधीच त्याचं क्षेत्र निवडलं होतं, कदाचित त्या क्षेत्रानं भूपिंदरला निवडलं होतं... नशीब... नाहीतर राजेश खन्नानं काय केलं असतं???
पण खरी सुरुवात तर पुढे आहे.... त्या प्रयाग राजला नाही का गंगा आणि यमुना गळाभेट करते आणि त्यातून सरस्वती उगम पावते... बॉलिवूडमध्ये पण तेच झालं... नियातीचं प्लॅनिंगच तसं होतं... भूपिंदरचा यमुनेसारखा जीवन प्रवाह "पंचम" सारख्या गंगेला येऊन मिळाला... आणि मग 1969 पासून पुढे पंचम जिवंत असेपर्यंत ते कधी विभक्त झाले नाहीत... या जोडीने काय काय दिलं तर... वर केलेली सुरुवात आठवतेय ना... ती स्टोरी इथे पूर्ण करतो... गाण्यात मोठा ब्रेक मिळून पण भूपिंदरला तितकासा प्रतिसाद नव्हता... मग त्याने गिटारिस्ट म्हणून काम सुरू केलं... तिथेच पांचमला तो भेटला आणि त्याच्याकडे गिटारिस्ट म्हणून काम करू लागला... काम? ते फक्त नावाला... पक्के मित्र होते दोघे... जे गुलजारच्या बाबतीत व्हायचं तेच भूपिंदरच्या, पंचम कधीही अपरात्री व्हिस्कीचे दोन पेग घेऊन याच्या घरी यायचा, सोबत नवीनच सुचलेली एखादी "धून" असायची आणि गाडीत बस म्हणून निघून जायचा... मग रात्रभर मुंबईच्या चकरा आणि गाण्याची तालीम... चालू गाडीत!!!
पंचमचं "चुरा लिया हैं तूमने" ऐकलंय ना? त्याची गिटार कुणी वाजवली? भूपिंदरने! अमरप्रेम मधलं "चिंगारी कोई भडके" त्यातली गिटार पण भूपिच! नंतर तर शोलेमध्ये भूपिंदरच्या गिटारवर पंचमने "मेहबूबा ओ मेहबूबा" गायलं... पण एक सिंगर म्हणून भूपीच्या आवाजाला कोणी खरा न्याय दिला असेल तर तो पण पंचमनेच... कारण किशोरदा यांनीच तसं पंचमला सांगितलं होतं.. "परिचय" मधलं "बिती ना बिताई रैना" ऐकलंय... त्यात लतानंतर पुढे कोणाचा आवाज आहे? भूपीचा! "हूजुर इस कदर भी ना" ऐकलंय? त्यात सुरेश वाडकर सोबत भूपीच आहे... अशी असंख्य गाणी पंचमने भूपिकडून वाजवून पण घेतली आणि गावून पण घेतली....
हे अपरिचित होतं म्हणून सांगितलं... बाकी "मौसम" मधलं "दिल ढूंढता है, फिर वही फुरसत के रात दिन" ज्याला मदन मोहन यांनी संगीत दिलं होतं आणि "घरोंदा" मधलं "दो दिवाने शहर में" हे जयदेवच्या सांगितलं गाणं भूपीच आहे... हे माहीत असेलच ना... गृहीत धरतो! पण या दोन्ही चित्रपटात या दोन्ही गाण्याचं Sad Version पण भूपिनेच गायलं आहे... ते नसेल ऐकलं तर ऐका... दोन्ही ऐका... भुपीच्या भारदस्त आवाजात! "किसी नजर को तेरा इंतजार आज भी है", फिल्म - ऐतबार, "करोगे याद तो हर बात याद आएगी", फिल्म- बाजार, "कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता", फिल्म- आहिस्ता आहिस्ता, "थोडी सी जमी, थोडा आसमा", फिल्म - सितारा, ही गाणी पण भूपीची आहेत... अशी खूप आहेत.. जी माहीत सर्वांना आहेत पण आवाजाची ओळख नाही... म्हणून भूपी गेल्यावर कोणाला तितकं दुःख झालं नाही...
गुलजार आणि भूपी! यांचं नातं लिहिलं तर सकाळ होईल... वर सांगितलेली सर्वच गाणी आणि तुम्हाला पण माहीत असलेल्या भूपिच्या गाण्यांपैकी अनेक गाणी गुलजारने लिहिली आहेत... अनेक गझल अल्बम पण दोघांनी एकत्र केलेत... गुलजारच्या अतीजवळच्या लोकांमध्ये भूपिंदर होता आणि राहील...आजही तो भूपिच्या आवाजाच्या प्रेमात असेल... त्याने स्वतःच्या चित्रपटात मुद्दाम काही गाणी भूपिला देऊ केली... भूपिने ती मोठी केली... गुलजार, पंचम आणि भूपि या नद्या आहेत... एकमेकांत मिसळून, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या... म्हणून गुलजार कदाचित पंचम सारखी भूपिवर पण एखादी कविता लिहेल आणि आपल्या भावनांना त्यात बंदिस्त करून टाकेल ... नाहीतरी गुलजार म्हणालाच आहे... "मेरा बस चले तो में भूपिंदर की आवाज ताबीज बनाकर पहन लूं",
पण दुःख होतं जेव्हा कोणाला भूपींदर माहीत नसतो... एक गिटारिस्ट... एक पार्श्व संगीत गायक आणि नंतर एक गझल गायक... भूपिंदर शेवटपर्यंत गात राहिला.... त्याची आणि माझी ओळख "हुजुर इस कदर" मधून झाली... कॉलेजमध्ये असताना या गझलचं एक कडवं मला आणि एक कडवं माझा मित्र Shreyas Sawant ला पाठ होतं... आजही आम्ही भेटलो की, तो त्याचा भाग गातो मी माझा... त्यात माझं भाग्य इतकंच की, भुपीच जो भाग आहे ना, तो माझ्या वाट्याला येतो... त्याला विसरून कसं चालेल...???